नागपूर - राज्य निवडणूक आयोगाने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन रद्द केल्याचा आनंद आहे. राज्य सरकारने यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्र्यांनीही स्वतः या प्रकरणात पाठीशी उभे राहून प्रयत्न केले. या निवडणुका रद्द झाल्याने कोणी केल्या यापेक्षा त्या निवडणुका रद्द झाल्या हे महत्त्वाचे असून हा ओबीसींचा लढ्याचा विजय असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. ते नागपुरात त्यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
निवडणुका रद्द व्हाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न केले -
या निवडणुका रद्द व्हाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री यांनी स्वतः निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. तर राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केले. ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाल्या शिवाय निवडणुका होऊ नये, अशीच भूमिका आम्ही घेतली होती, असेही वडेट्टीवार म्हणाले.
इंपेरिकल डेटा सुप्रीम कोर्टात सादर करेपर्यंत शांत बसणार नाही -
यात निवडणुका रद्द होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वाटेल ते वकील उभे करा पण निवडणुका रद्द झाल्या पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. सुप्रीम कोर्टाकडून जी माहिती मागण्यात आली ती माहिती वेळोवेळी देण्याचे काम राज्य सरकारने केले. निवडणूक आयोगाला अधिकार दिल्यावर राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी पत्र लिहून निवडणुका रद्द कराव्यात असे पत्र 7 जुलैला निवडणूक आयोगाला दिले. 8 जुलैला डिझास्टर मॅनेजमेंट विभागाने पत्र दिले. आरोग्य विभागाने पत्र दिले. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोनाच्या परिस्थितीचा अहवाल मागवला आणि त्यानंतर कोरोनाच्या परिस्थितीवर निवडणुका रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. हा ओबीसीच्या लढ्याचा विजय आहे. यामुळे आता मागासवर्ग आयोगाची नेमणूक झाली आहे. येत्या तीन महिन्यात इंपेरिकल डेटा तयार करून सुप्रीम कोर्टात तो सादर करून ओबीसीचे आरक्षण मिळाल्या शिवाय शांत बसणार नाही, असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
मुंबई लोकलवर योग्यवेळी मुख्यमंत्री निर्णय घेतील -
मुंबई लोकल सुरू करण्यासाठी पूर्ण विचारपूर्वक हा निर्णय घ्यावा लागणारा आहे. मुख्यमंत्री तज्ञ समितीच्या मंडळींशी चर्चा करुन नंतर निर्णय घेतील. सध्याच्या घडीला राज्यात दुसरी लाट ओसरत असतांना तिसऱ्या लाटेचा धोका आहे. यातच पहिल्या लाटेतील कोरोनाची रुग्णसंख्या उच्चांकावर असतांना जेवढे रुग्ण मिळत होते, तितकेच रुग्ण आजही आहे. दररोज अजुनही 10 हजाराच्या घरात नवीन कोरोना बाधित रुग्ण मिळत असल्याने लगेच निर्णय घेता येणार नाही. यात लोकांची मागणी दोन डोस झालेल्याना परवानगी द्या ती बरोबर असली तरी दोन डोस नंतर सुद्धा अनेकांना कोरोना झाला आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची भीती असल्याने योग्य वेळी सर्व तज्ञ मंडळींशी चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील असे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
भाजपकडून राज्यातील मास लिडरवर अन्याय -
केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आले या दुसऱ्या पक्षाच्या विषयांवर बोलणे उचित नाही. पण समाज माध्यमातून प्रश्न उपस्थित होत आहे. ओबीसी चळवळीत महत्वाचे योगदान असलेले नेते म्हणून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे होते. ओळख नसलेल्या समाजाला ओळख करून देण्याचे काम खऱ्या अर्थाने गोपीनाथ मुंडे यांनी केले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. यामुळे अपेक्षा असणे यात गैर नाही. मुंडे भगिनी चांगल्या मतांनी निवडूण आलेल्या आहे. पण त्यांना का डावलले जाते हे माहीत नाही. विधान परिषदेच्या बाबतची पंकजाताईनी खंत व्यक्त केली. त्यांच्या भगिनीवर झालेला अन्याय आहे. राजकीय परिस्थिती पाहता काय निर्णय घ्यायचा तो त्या पक्षाचा अधिकार आहे. पण राज्यातील चंद्रशेखर बावनकुळे असो एकनाथ खडसे, पंकजा मुंडे या मास लीडरवर अन्याय होत असल्याची भावना या माध्यमातून समोर येत असल्याची चर्चा आहे.
वडेट्टीवारांनी दिला सूचक इशारा -
काही पक्ष ओबीसी नेत्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार झाली आहेत. राजकारण करत आहेत. ओबीसींच्या नेत्यांना आता मात्र समज यायला लागली आहे. त्यांचा वापर करून बाजूला केले जात आहे. ही भावना बळावली तर त्या पक्षाचे काही खरे नाही हा विचार करा असा सूचक इशारा सोशल माध्यमातून मांडला जात आहे. ओबीसींच्या वाट्याला येत आहे. यामुळे ओबीसींच्या नेत्याचा वापर होऊ नये अशी मोट बांधली गेली पाहिजे आणि येत्या काळात होईल असे म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपवर ओबीसीना धरून निशाणा साधला.
हेही वाचा - राज्यातील निवडणुका स्थगित करणे हा तर आयोगाचा निर्णय; सरकारचे यश नव्हे - बावनकुळे