नागपूर - तब्बल पाच वर्षानंतर नागपूरच्या बहुचर्चित एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. निमगडे खून प्रकरणात नागपूरचा कुख्यात गुंड रणजीत सफेलकर आणि त्याचा सहकारी कालू हाटेचा सहभाग असल्याचा दावा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला आहे. सध्या या खुनाच्या घटनेचा तपास सीबीआय करत असल्याने नागपूर पोलिसांनी सर्व माहिती सीबीआयच्या पथकाला दिली आहे. व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या एकनाथ निमगडे यांची 6 सप्टेंबर, 2016 रोजी भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कोट्यवधी रुपयांच्या जमिनीच्या वादातून काही अज्ञात लोकांनी एकनाथ निमगडे यांचा खून झाला होता. खुनाची सुपारी रणजित सपेलकरने दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
एकनाथ निमगडे (वय 72 वर्षे) मॉर्निंग वाक करून अग्रसेन चौकाजवळच्या मिर्झा गल्लीतून घराकडे परतत असताना अज्ञात गुंडानी त्यांच्यावर चार गोळ्या झाडून पळ काढला होता. दाटीवाटीच्या परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाची गोळ्या झाडून हत्या झाल्यामुळे नागपुरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांनी केला होता. मात्र, अनेक आठवडे तपास केल्यानंतरही पोलिसांना कोणतेही यश मिळाले नसल्यामुळे निमगडे कुटुंबियांनी हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. त्यानंतर या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.
तपास सीबीसीय कडे हस्तांतरित
सीबीआयने ही सुमारे चार वर्षे एकनाथ निमगडे यांच्या हत्येचा तपास केल्यानंतर ही हत्या कोणी आणि का केली याचा उलगडा करण्यात सीबीआयला यश मिळाले नव्हते. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या काही दिवसांपासून अनेक वर्षांपासून उलगडा न झालेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास नव्याने सुरू करण्याचे निर्देश नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिले होते. त्याच अनुषंगाने गुन्हे शाखेने एकनाथ निमगडे हत्या प्रकरणाबद्दल शंका असलेल्या गुन्हेगारांवर नजर ठेवून त्यांची चौकशी सुरू केली होती. याच चौकशी दरम्यान नागपूर-वर्धा रोडवर कोट्यवधींच्या एका जमिनीच्या वादातून एकनाथ निमगडे यांच्या हत्येची सुपारी कुख्यात गुन्हेगारांना देऊन त्यांची हत्या घडवण्यात आल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत.
कुख्यात गुंड रणजित सफेलकर निघाला म्होरक्या
नागपूरच्या कुख्यात गुंड रणजीत सफेलकर आणि त्याचा साथीदार कालू हाटेला काही अज्ञात लोकांनी ही पाउणे दोन कोटी रुपयात हत्येची ही सुपारी दिल्याचे निष्कर्ष पोलिसांनी काढले आहे. दरम्यान, तांत्रिक दृष्ट्या या हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे असल्याने नागपूर पोलिसांनी त्यांच्या तपासातील निष्कर्ष सीबीआयला सोपविले आहे. नागपूर पोलिसांच्या माहितीला तपासून घेण्यासाठी सीबीआयच्या खास पथकाने नागपूर गाठून त्यासंदर्भात तपासही सुरू केला आहे. लवकरच सीबीआयचे अधिकारी या प्रकरणात अटकेची कारवाई करतील, असेही नागपूर पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा - संचारबंदीतही नागपूरकर बेफिकरीच; रस्त्यांवर गर्दी कायम, पोलीस बघ्याच्या भूमिकेत
हेही वाचा - गर्दी टाळण्यासाठी केलेल्या नव्या नियमांमुळे कोरोनाच्या रुग्णवाढीचा धोका?