नागपूर - तब्बल ८५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आज (बुधवार) दिवसभरात करण्यात आली आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण पुढे येण्याची ही नागपुरातील पहिलीच घटना आहे. आज कोरोनाचा उद्रेक झाल्याने नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८६२ झाली आहे. तर, आज २४ रुग्ण उपचारानंतर कोरोनावर यशस्वीरित्या मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५२४ इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यंत १५ रुग्णांचा मृत्यूदेखील झालेला आहे.
शहरातील पहिला कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरात कोरोनावर बऱ्यापैकी अंकुश लावण्यात यश मिळाले होते. असे असताना मोमीनपुरा भागात कोरोनाचा दुसरा हॉटस्पॉट तयार झाला. तर, तेथील परिस्थिती अद्याप आटोक्यात आली नसताना आता शहरातील नाईक तलाव व बांगलादेश परिसर हा करोनाचा तिसरा हॉटस्पॉट ठरला आहे. बुधवारपर्यंत या परिसरातील एकूण 180 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग शहरात इतर ठिकाणी होऊ नये, म्हणून हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तर, नियमांचे अधिक काटेकोरपणे पालन करण्यात येणार असल्याचेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या परिसरातील चार व्यक्तींनी एकाच्या घरी छोटेखानी पार्टी केली होती. या चौघांपैकी दोघांची प्रकृती काही दिवसांनी बिघडली. मेयो शासकीय रुग्णालयात तपासणी केल्यावर त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींना वेळीच क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु, तोपर्यंत करोनाची साखळी ही बरीच लांबली होती. त्यामुळे केवळ १३ दिवसांच्या कालावधीत नाईक तलाव व बांगलादेश परिसरातील शंभरहुन अधिक नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला होता. मात्र, आज या भागातील ६१ रुग्ण पुढे आल्याने नाईक तलाव परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १८० वर गेला आहे.