नागपूर : होळी म्हणजे सप्तरंगांची उधळण आणि सर्वत्र उत्साह असतो. जल्लोषाचे वातावरणाची पर्वणी देणारा सण म्हणून संपूर्ण भारतभर साजरा करण्यात येतो. होळीच्या सणाला देशाच्या विविध भागात अतरंगी परंपरेचे पालन केले जाते. त्यामध्येच एक म्हणजे महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवरील दोन गावांमध्ये होणारी गोटमार परंपरा सर्वत्र प्रसिद्ध आहे. आणखी एका परंपरा विदर्भात प्रसिद्ध आहे, ती म्हणजे शेणापासून तयार होत असलेले गोळे किव्हा चकऱ्या. शेणाच्या या चकऱ्याना 'चाकोल्या' सुद्धा म्हंटले जाते. विशेषतः आज सुद्धा ग्रामीण भागात होळीचा सणासाठी या चकऱ्या आजही तयार केल्या जातात. ज्यामुळे होळी जाळण्यासाठी फार लाकडांची गरजचं पडत नाही. महत्त्वाचे म्हणजे शेणाच्या चकऱ्या आता अनेकांच्या उपजीवीकेचे साधन म्हणून देखील पुढे आले आहे.
चाकोल्यांनी दिला रोजगार : होळीचा सण जवळ येताच विदर्भात शेण गोळा करण्यासाठी लगबग सुरू होते. मात्र, या शेणाच्या चाकोल्या विकून रोजगार निर्मिती होऊ शकते, याचा विचार पूर्वी कुणीही केला नसेल. मात्र, आता या चाकोल्या नागपूरसारख्या शहरात देखील विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरी होळी सण उत्साहात साजरा होतो. ग्रामीण भागात शेणापासून तयार होणाऱ्या चकऱ्या तयार करून त्या आता शहरात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
पर्यावरणपूरक शेणाच्या चाकोल्या : होलिका दहन करताना वृक्ष तोड करू नका, पर्यावरणपूरक होळी साजरी करा, निसर्ग सुरक्षित राहील या दृष्टीने विचार करा, असे आवाहन दरवर्षी केले जाते. मात्र, होलिका दहन करताना या आवाहनांकडे कुणीही फारसे लक्षच देत नाही. उलट सर्रासपणे दरवर्षी हजारो झाडांची कत्तल केली जाते. मात्र,हा धोका लक्षात घेता आपल्या पूर्वजांनी शेणाचा उपयोग करून निसर्ग सुरक्षित राहील, अश्या पध्दतीने होळी साजरी करण्यात सुरवात केली होती.
मोबाईलमुळे पारंपरिक खेळ-उत्सव पडले मागे : पूर्वीच्या काळात एखाद्या गावातील सर्व लहान मंडळी होळीची मज्जा एकत्र येऊन लुटायचे. पण आता दिवसभर हातात मोबाईल राहत असल्याने ग्रामीण भागात बालपण हरवायला सुरुवात झाली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात केवळ मोबाइलवर गेम खेळण्याकडे कल वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नवीन पिढी आभासी दुनियेत जास्त रमताना दिसत आहे. ते रीतीरिवाज परंपरा यांपासून दुरावत चालले आहेत.
हेही वाचा : Holi 2023 : अशी साजरी होते देशातील विविध राज्यांमध्ये होळी, जाणून घ्या खास पद्धती