नागपूर - वरिष्ठ प्रशिक्षक विजय भालचंद्र मुनिश्वर यांना क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्काराचा सन्मान मिळवणारे विजय मुनिश्वर हे वैदर्भीय क्रीडाक्षेत्रात पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. विजय भालचंद्र मुनिश्वर हे नागपूरसह विदर्भातील ज्येष्ठ क्रीडा संघटक आहेत. मुनिश्वर हे अर्जुन पुरस्काराचे मानकरी असून त्यांना दिव्यांग प्रवर्गातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारे प्रशिक्षक म्हणूनही ओळखले जाते.
राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणजे २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. क्रीडा पुरस्कार निवड समितीने १८ ऑगस्टला खेळाडूंसोबतच विविध पुरस्कारांसाठी प्रशिक्षकांची शिफारस केली होती. पॅरा पॉवरलिफ्टिंग खेळात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल विजय मुनिश्वर यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. क्रीडा मंत्रालयातर्फे शुक्रवारी सर्व राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची घोषणा केली असून द्रोणाचार्य पुरस्कारासाठी विजय मुनिश्वर यांना जाहीर करण्यात आला आहे.
विजय मुनिश्वर यांनी खेळाडू म्हणून ३१ वेळा आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी प्रत्येकी तीन सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके जिंकली आहेत. विजय मुनिश्वर यांनी सहावेळा पॅरालिम्पिक स्पर्धेतही देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. मुनिश्वर यांच्या मार्गदर्शनात अनेक प्रतिभावंत खेळाडू घडले आहे. मुनिश्वर यांनी आतापर्यंत राजेंद्रसिंग राहेलु, अर्जुन पुरस्कार विजेते परमान बाळा, १४ शिवछत्रपती व एकलव्य पुरस्कार प्राप्त आणि ३५ आंतरराष्ट्रीय पदक विजेते तसेच अनेक राज्य पुरस्कार विजेते खेळाडू घडवले आहेत.
विजय मुनिश्वर यांना २००० मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. २००४ आणि २००६ ला मुनिश्वर यांचा आयपीसीने उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनातर्फे विजय मुश्विर यांना १९९०-९१ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कर आणि २००६-०७ मध्ये दादोजी कोंडदेव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. वेकोलित सिव्हील इंजिनीअर म्हणून कार्यरत विजय मुनिश्वर महाराष्ट्र राज्य पॅरालिम्पिक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आणि पीसीआय पॉवरलिफ्टिंग इंडियाचे चेअरमन आहेत.