नागपूर - आदिवासी विकास मंत्रालयाचे नवनियुक्त मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज नागपूर येथे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी आदिवासी विभागाच्या बजेटचे योग्य नियोजन झाले असते, तर आज आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांची इतकी वाईट अवस्था झाली नसती, असे म्हटले आहे.
आदिवासी विकास विभागाचे बजेट खूप आहे. त्यामुळे यापूर्वी योग्य पद्धतीने नियोजन केले असते, तर आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांवर, अशी वेळ आली नसती, असे विधान विरोधी पक्षांचे नव्हे तर खुद्द आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आदिवासी विभागाद्वारे दिल्या जाणाऱ्या अनुदानानंतरही आश्रमशाळा आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहांची अवस्था विदारक का आहे, या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. उईके बोलत होते.
यापूर्वी जर विभागाच्या बजेटचे योग्य नियोजन झाले असते तर आज सर्वत्र अद्ययावत आश्रम शाळा आणि वसतिगृह राहिले असते, असे डॉ. उईके म्हणाले. यापुढे आदिवासी विकास विभागाने स्वतःची बांधकाम यंत्रणा उभारण्याचे ठरविले असून त्यांच्यामार्फत आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहाचे बांधकाम केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, पुढील दोन महिन्यांत आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्याच्या बहुतांशी समस्या सोडवू, असा दावाही त्यांनी केला. डीबीटी योजनेला काही घटकांचा विरोध असला तरी ती विद्यार्थ्यांच्या फायद्याची आहे. मात्र, जे लोकं विरोध करत आहेत, त्यांनी उचललेल्या मुद्द्यांचाही विचार करू, असेही ते म्हणाले.