नागपूर - कुत्र्याच्या वाट्याला गेलात तर तो व्यक्तीला चावा घेतल्याशिवाय सोडत नाही, असा अनुभव अनेकांना आला आहे. मात्र, चावा घेण्यात कुत्राच नाही तर इतर पाळीव प्राणीही मागे नसल्याची माहिती पुढे आली आहे. नागपुरामध्ये गेल्या पावणे चार वर्षात पाळीव मांजर, उंदीर, वानर, डुक्कर, मुंगूस, ससा या प्राण्यांनी ४ हजार ७८० लोकांना चावा घेतला. तर कुत्र्यांनी तर ७५ हजार ५८७ नागरिकांना चावा घेऊन जखमी केले असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी दिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चावा घेणाऱ्या कुत्र्यांमध्ये ३५ हजार पाळीव तर ४० हजार भटक्या कुत्र्यांचा समावेश आहे.
घरात पाळीव प्राणी पळताना त्या प्राण्यांचे लाड पुरवले जातात, ते करत असताना अनेकांना त्या प्राण्यांनी चावा घेतल्याच्या घटना ऐकायला येतात. नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी या संदर्भात माहितीच्या अधिकरात माहिती मागवली होती. यात धक्कादायक आकडे पुढे आले आहेत.
हेही वाचा - पिसाळलेल्या श्वानाला बंदुकीतून गोळी मारताना आजोबाचा नेम चुकला अन्..
आकडेवारी काय सांगते?
१ जानेवारी २०१७ ते ३० सप्टेंबर २०२०पर्यंतच्या काळात एकट्या नागपूर शहरात कुत्र्यांनी तब्बल ७५ हजार ५८७ नागरिकांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर पाळीव प्राण्यांनीही ४ हजार ७८० नागरिकांचा चावा घेऊन जखमी केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. दरम्यान, नागपुरात समोर आलेली ही आकडेवारी बघता मांजरीने माणसाला चावा घेण्याच्या यादीत दुसरा क्रमांक पटकाविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाळीव प्राणी घरी पाळताना सावध राहण्याची गरज आहे.
कोणत्या प्राण्याने किती नागरिकांना चावा घेतला?
- कुत्रा - ७५ हजार ५८७
- मांजर - ३ हजार १३
- उंदीर - ५९८
- वानर - ५८४
- डुक्कर - २१८
- मुंगूस - २१४
- ससा - ४४ आणि इतर प्राणी - १०९