नागपूर - येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेयो) एमडी प्रथम वर्षाला असलेल्या डॉक्टरने वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मन्युकुमार वैद्य असे या डॉक्टरचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या भावाला मेसेज पाठवल्याची माहिती आहे.
डॉ. मन्युकुमार वैद्य हे मूळचे कर्नाटकमधील रहिवासी होते. नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ते एमडी प्रथम वर्षाला होते. त्यांनी स्त्रीरोग व प्रसूती विभागमध्ये प्रवेश घेतला होता. वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहातच ते राहत होते. आज त्यांचा बाह्य रुग्ण विभाग तपासणी दिवस होता. मात्र, ते आले नसल्याने त्याठिकाणी सुरक्षारक्षकाला पाठवण्यात आले असता त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यासंदर्भात त्यांनी तपास सुरू केला असून कर्नाटकमधील त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत मन्युकुमार यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या भावाला एक मेसेज केला होता. त्यात त्यांनी आपले जीवन संपवत आहे, असे लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डॉ. मन्युकुमार यांनी आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झाले नाही. मात्र त्यांच्या आत्महत्येमुळे डॉक्टर वर्तुळात मोठी खडबड माजली आहे.