नागपूर - आर्थिक फसवणूक केल्यामुळे महाठग अजित पारसेचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे. सदर प्रकरणामध्ये आरोपीविरुद्ध प्रत्यक्ष सहभाग आणि रक्कमेबाबत देवाण घेवाण केल्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज खारीज केला जावा अशी मागणी सरकारी पक्षाने न्यायालयात मांडली होती. ती मागणी ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला. गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांच्या तावडीतून मोकाट असलेल्या महाठग अजित पारसेने अनेकांना कोट्यवधी रुपयांने गंडा घातला आहे. मात्र अजित पारसेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
सीबीआय चौकशीची बतावणी करत उकळले कोट्यवधी रुपये या प्रकरणातील तक्रारदार डॅाक्टर राजेश मुरकुटे यांना मेडीकल कॅालेजची परवानगी प्राप्त करुन देण्याचे आमिष पारसेने दिले होते. त्याचप्रमाणे सीबीआयकडून तुमची चौकशी सुरु असल्याचे सांगून वेळोवेळी ४ कोटी ३६ लाख रुपयाची मुरकुटे यांची फसवणूक केली. डॉक्टर मुरकुटे यांनी केलेल्या तक्रारीवरुन आरोपी अजित पारसे विरुद्ध अनेक कलमांतर्गत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अजित पारसे गंभीर आजारी असल्याने पोलिसांनी त्याला अद्यापही अटक केली नाही, हे विशेष
सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा निकटवर्तीय सत्ताधारी तसेच विरोधकांसह विविध राजकीय पक्षातील लहान-मोठ्या नेत्यांच्या अजित पारसे हा फार जवळचा असल्याचे बोलले जाते. तसेच तो सोशल मीडियाचा इन्फल्यूएन्सर म्हणून मिरवतो. अजित पारसे विरुद्ध नागपूर शहर पोलिसांनी साडेचार कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. अजित पारसेने एका होमिओपॅथी डॉक्टरला होमिओपॅथी रुग्णालय सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन तब्बल साडेचार कोटी रुपये उकळले. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरने कोतवाली पोलीस ठाण्यात अजित पारसे विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सध्या अजित पारसेची तब्येत अजूनही नाजूक आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
अजित पारसेसकडे सरकारी शिक्के सदर प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. अजित पारसे यांच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेतली असता राजमुद्रा असलेले शिक्के, पोलीस, बँक, पोलीस स्टेशन, आयकर विभागाचे शिक्के, तसेच शासकीय कार्यालयाचे बनावट सील व शिक्के सापडले. सरकारी शिक्के अजित पारसेसकडे सापडल्याने खळबळ उडाली आहे.
अनेकांना अडकवले हनीट्रॅपमध्ये सोशल मीडियाचा इन्फल्यूसर, विश्लेषक आणि तज्ज्ञ म्हणून अजित पारसे हा मिरवत होता. त्याने अनेक बड्या शासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील नामांकित डॉक्टरांना हनीट्रॅपमध्ये अडकवून कोट्यवधी रुपये उकळल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. आरोपी अजित पारसे हा अनेकांना दिल्लीतील नेत्यांसोबत ओळख देण्याच्या बहाण्याने दिल्लीत घेऊन जात होता. दिल्ली दौऱ्यात तो त्या व्यक्तीची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करायचा. याच दरम्यान ते खोलीत तरुणीला पाठवून तिच्यासोबत अश्लील छायाचित्रे काढायचा. त्यानंतर छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन पारसे खंडणी वसूल करत होता अशी माहितीही पुढे आली आहे.
सीबीआय चौकशीची धमकी देऊन पैसे उकळले अजित पारसेने अनेकांना सीबीआय चौकशीची धमकी देऊन कोट्यवधी रुपये वसूल केल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली होती. माझी पंतप्रधान कार्यालय, सीबीआयमध्ये ओळख आहे. तुमच्या विरुद्ध सीबीआयची गुप्त चौकशी सुरू असून तुम्हाला अटक सुध्दा होऊ शकते, अशी भीती दाखवून अजित पारसेने अनेकांना लुटल्याचे पुढे आले आहे.