नागपूर: उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक रंगली आहे. काय होतास तू काय झाला तू असा कसा वाया गेलास तू अश्या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. ते नागपुरात आयोजित सावरकर गौरव यात्रेच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा काँग्रेसच्या मुखपत्राने लेख लिहिला होता की, सावरकर समलैंगिक होते अश्या वल्गना केल्या. मात्र, तेव्हा ठाकरे काँग्रेसला विरोध देखील करू शकले नाही. आज उद्धव ठाकरे सभेत बोलतात की सावरकरांचा विरोध आम्हाला चालणार नाही. मात्र, अजूनही रोज सावरकरांना शिव्या दिल्या जात आहेत. तुम्ही त्याच्या गळ्यात गळे टाकून फिरता असे फडणवीस म्हणाले आहेत.
राहुल गांधीना आवाहन: देशात काही लोक असे जन्माला आले आहेत, ज्यांना देशाचा इतिहास माहीत नाही. तसेच स्वतःचा इतिहास देखील माहीत नाही. ते वीर सवरकरांविषयी अपशब्द बोलतात. नादान माणसा तू सावरकर होऊ शकत नाही. गांधी देखील होऊ शकत नाही, अश्या शब्दात त्यांनी राहुल गांधींचा समाचार घेतला. ज्या अंधाऱ्या खोलीत सावरकरांना कोंडून ठेवले होते, त्या खोलीत राहुल गांधींनी राहून दाखवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधीना दिले आहे. स्वातंत्र्य वीर सावरकरांनीचं देशात खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती पेटवली, ते माफीवीर नव्हते. राहुल गांधीनी आमचे सोडावे. निदान स्वतःच्या आजी, आजोबांचे तरी ऐकावे ज्यांनी सावरकरांच्या बद्दल गौरवोद्गार काढले होते.
त्यांना कालचक्र समजत नाही: आज आम्ही सगळे ज्या महापुरुषाच्या गौरव यात्रेसाठी एकत्र आलो आहे. त्या सावरकरांनी देशभक्तीचे सूत्र दिले. वीर सावरकरांनी 1857 सालच्या उठावाला स्वातंत्र्याचे पाहिले संग्राम म्हटले होते. या पहिल्या स्वतंत्रता संग्रामची सुरूवात महाराष्ट्राच्या भूमीतून सुरूवात झाली होती. जे लोक सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने करतात, त्यांना कालचक्र समजत नाही. नवे संसद भवन तयार होत आहे. राम मंदिर देखील तयार होत आहे. हिंदुत्वाचा विषय सावरकरांनी दिला असे काहीजण म्हणतात. तर मग शिवाजी महाराजांचे साम्राज्य मग कशाचे द्योतक होते?
व्यक्ती हा जातीने मोठा नसतो : सावरकर यांच्या जीवनात अनेक अशा गोष्टी आहेत. ज्याला तोड नाही, सर्वाधिक त्याग सावरकरांनी केला आहे. वाजपेयी पंतप्रधान असताना जेलमध्ये पाटी लावण्यात आली होती, जी नंतर काढण्यात आली. स्वातंत्र्य कसे मिळवावे त्यात मतभिन्नता होती, मार्ग भिन्न असले तरी उद्दिष्ट एकच होते. हिंदू धर्मात अनेक रूढी व अस्पृश्यता होती. त्यावेळी सावरकरांनी भूमिका मांडली की व्यक्ती हा जातीने मोठा नसतो. अंधश्रद्धा विरुद्ध, सामाजिक रूढी विरुद्ध होते, सावरकर एक उत्तम कवी आणि साहित्यिक म्हणून ओळखले जातात.
सावरकर गौरव यात्रेचा समारोप: महाराष्ट्राचे सुपूत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टीने सावरकर गौरव यात्रा काढली. या गौरव यात्रेचे समारोप मंगळवारी नागपुरातील शंकर नगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे उपस्थितीत होते.