नागपूर - गेल्या एक महिन्यापासून राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल हे प्रतिनियुक्तीवर केंद्रात जाणार असल्याची चर्चा सुरू होती. काल त्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. सुबोध जयस्वाल हे राज्य सरकारच्या कामकाजाला कंटाळून केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जयस्वाल हे एक अतिशय कार्यक्षम पोलीस महासंचालक राज्याला लाभले होते. मात्र, ज्या पद्धतीनं राज्यात कारभार चालला आहे. पोलीस महासंचालकांना विश्वासात न घेता पोलीस विभागाचा कारभार सुरू आहे. त्यामुळं कंटाळून त्यांनी प्रतिनियुक्ती मागितली, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
पोलीस विभाग हे स्वतंत्र खाते आहे. स्वायत्तता या विभागाला आहे. मात्र, या विभागात मोठा हस्तक्षेप सुरू आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासात पोलीस महासंचालकांनी कंटाळून प्रतिनियुक्ती मागण्याची पहिलीच वेळ असेल, हे राज्यासाठी भूषणावह नाही, याचा पोलीस विभागावर नक्कीच परिणाम होईल, असंही फडणवीस म्हणाले. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे बदल्यांच्या राजकारणाला कंटाळले होते. अगदी छोट्यात छोट्या बदल्या करताना सुद्धा त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने त्यांनी केंद्राकडे प्रतिनियुक्ती मागितली होती.
कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल?
सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ RAW मध्ये काम केले आहे. RAW मध्ये त्यांनी 9 वर्षे महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. सुबोध जयस्वाल यांच्याकडे तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा तपास सोपवण्यात आला होता. सुबोधकुमार हे 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात देखील सहभागी होते. मुंबई पोलीस दलात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. जुलै 2018 मध्ये सुबोधकुमार यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली होती.