नागपूर - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनार्थ आज नागपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले होते. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे कोणत्याही जाती किंवा धर्माच्या विरोधात नसल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूरमधील यशवंत स्टेडियम, झाशीची राणी चौकातून हा मोर्चा निघाला. मोर्चामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी मुख्यमंत्र्यानी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांवर निशाणा साधला. राजकीय फायद्यासाठी राजकीय पक्ष लोकांची दिशाभूल करीत आहेत. तसेच लोकांची संभ्रम निर्माण करत असल्याचेही ते म्हणाले.