नागपूर- केंद्र आणि राज्य पातळीवर साऱ्या यंत्रणा करोनाशी झुंजत असल्या तरी देशात कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे गेल्या २४ तासात नागपूर शहरात तब्बल १७ कोरोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. यातील बहुतांश कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोनिनपुरा आणि सतरंजीपुरा भागातील आहेत. त्यामुळे प्रशासनाने या दोन्ही भागाला सील केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सतरंजीपुरा भागात सैन्याची मदत घ्यावी, अशी मागणी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.
हेही वाचा- ''लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार"
गेल्या आठवड्यात नागपुरात एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ज्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तो रुग्ण सतरंजीपुरा भागात राहणारा असल्याने, महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने संपूर्ण सतरंजीपुरा परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेतले होते. त्यावेळी तेथील काही नागरिकांनी मनपाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना काम करण्यास मज्जाव केला होता. परिणामी सतरंजीपुरा भागात आणखी कोरोना बाधित रुग्ण समोर आल्यानंतर या भागाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी संपूर्ण सतरंजीपुरा भागात मिल्ट्री तैनात करण्याची मागणी केली आहे.