नागपूर - नागपूर महापालिका परिवहन विभागात येणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसच्या संचलनाचे दर निर्धारित करण्यावरून मनपा आयुक्त राधाकृष्णन बी आणि परिवहन सभापती बाल्या बोरकर आमने सामने आले आहेत. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे नागपूर महानगरपालिकेत कार्यरत असताना सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, मात्र वर्तमान आयुक्त दोष काढत आहेत, त्यामुळे इलेक्ट्रिकल बसेसची खरेदी करण्यासाठी आलेला निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयुक्त राधाकृष्णन बी यांनी प्रतिकिलो मीटर दर कमी करण्यासाठी हट्ट धरल्याचा आरोप परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी केला आहे.
नागपूर महापालिकेने केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानानंतर ४० इलेक्ट्रिकल बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बसेस खरेदी केल्यानंतर त्या बसेस चालवण्यासाठी एका कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्या कंपनीसोबत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी वाटाघाटी करून ६६ रुपये प्रति किलोमीटरचे दर निश्चित केले होते. मात्र आता नवीन आयुक्त राधाकृष्णन बी यांनी हे दर जास्त असल्याचे सांगत पुन्हा वाटाघाटी करण्यावर ते ठाम आहे, त्यामुळे आता या बसेस खरेदीच्या संपूर्ण प्रक्रियेवर टांगती तलवार लटकलेली आहे.
निधी परत जाण्याची शक्यता
४० इलेक्ट्रिकल बसेस खरेदी करण्यासाठी सभागृहाने मान्यता दिली आहे.यासाठी केंद्राने ३ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान सुद्धा दिले आहे. मात्र बस चालविण्याच्या दर निश्चितीवरून सुरू झालेल्या वादामुळे ही खरेदी बारगळण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात दहा बसेस खरेदी झाल्या नाहीत तर केंद्राने पाठवलेले अनुदान परत जाण्याची शक्यता आहे.