नागपूर - जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये गुरुवारी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे जवळपास २२ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान कापसाच्या पिकाचे झाले असून १३ हजार हेक्टरवरील पीक वाया गेले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षणकरण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
जिल्ह्यातील जवळपास ११६ गावामध्ये गुरुवारी जोरदार गारपीट झाली. यामध्ये तूर, कापूस, गहू, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले आहे, तर संत्रा आणि मोसंबी या फळबागांचे देखील नुकसान झाले. जवळपास ३ हजार हेक्टर क्षेत्रामधील तूर पिकांचे आणि ४ हजार हेक्टर क्षेत्रातील संत्रा आणि मोसंबीचे नुकसान झाले असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आज त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांनी भेटून उशीर न करता सर्वेक्षण सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच ग्रामसभा आणि स्थानिक लोकांना माहिती देऊन सर्वेक्षण करावे, असेही ते म्हणाले. तसेच किमान ५० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला.