नागपूर - क्राईम सिटी असलेल्या नागपूरसाठी जून महिना फारच जड गेल्याचे आकडे पुढे आले आहेत. नागपूर शहर आणि जिल्ह्यात जून महिन्याच्या ३० दिवसांमध्ये तब्बल 18 लोकांचा खून झाला आहे. यापैकी 9 घटना नागपूर शहरात घडल्या. ज्यामध्ये १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूर ग्रामीणमध्येही 5 खुनाच्या घटनांची नोंद आहे. ज्यात 4 व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. गंभीर बाब म्हणजे यापैकी काही घटना टीव्ही आणि इंटरनेटवरील क्राईम शो बघून घडल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. नागपूर पोलीस विभागाकडून गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, अनके घटना कौटुंबिक कलहातूनही घडल्या आहेत.
15 वर्षीय मुलाच्या हत्याकांडापासून हत्यासत्र सुरू -
नागपूरच्या गुन्हेगारी विश्वाचा इतिहास बघितला तर एक बाब प्रकर्षाने लक्षात येते, की उपराजधानीत खुनाचे सत्र सुरू झाल्यानंतर लागोपाट खुनी घटना घडत असतात. हा क्रम गेल्या काही वर्षांपासून असाच सुरू आहे. एकदा खुनाच्या घटना घडायला सुरवात झाली, तर त्या लवकर थांबत नाहीत. जून महिन्यातसुद्धा नागपूरकरांना याचा अनुभव आला आहे. जून महिन्यात नागपूर जिल्ह्यात तब्बल १४ खुनाच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये 18 लोकांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील ५ सदस्यांचा खून केल्यानंतर आरोपीने स्वतः आत्महत्या केल्याची घटना देखील समाविष्ट आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाच्या अपहरण व हत्याकांडापासून हत्यासत्र सुरु झाले.
क्राईम शो पाहून घडलेल्या घटना :-
15 वर्षीय मुलाची अपहरणानंतर हत्या
१२ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १५ वर्षीय राज पांडे या विद्यार्थ्याचे अपहरण झाले. त्याच्याच परिचित असलेल्या सुरज रामभुज शाहू या आरोपीने अपहरण करून राजचा खून केला. मृत राजच्या काकांसोबत असलेल्या जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपीने राजचे अपहरण करून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. हे कृत्य करण्यापूर्वी आरोपीने इंटरनेटवर अनेक क्राईम शो बघितल्यानंतर षडयंत्र रचले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या
२२ जून रोजी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आलोक माटूरकरने मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधातून स्वतःच्या कुटुंबातील 5 जणांची हत्या केली. यात त्याची पत्नी, मुलगी, मुलगा, साळी आणि सासूचा समावेश आहे. ती रात्र रक्तरंजित केल्यानंतर आरोपी आलोकनेसुद्धा आत्महत्या केली होती. धक्कादायक म्हणजे घरातील 5 लोकांना रक्तात लोळवण्यापूर्वी आरोपी गेल्या काही दिवसांपासून टीव्ही आणि इंटरनेटवर क्राईम शो बघत होता. त्यातूनच प्रेरित झाल्यानंतर आरोपीने इतके मोठे हत्याकांड घडवल्याची माहिती पोलिसांच्या तपासात हाती लागली आहे. दरम्यान, विजया माटूरकर (पत्नी), बिंटी माटूरकर (मुलगी), साहिल माटूरकर (मुलगा), लक्ष्मी बोबडे (सासू) आणि अमिषा बोबडे (मेहुणी) अशी आलोकने हत्या केलेल्यांची नावे आहेत.
आलोकच्या धाकाने मेहुणी राहायची वेगळी
एप्रिल महिन्यामध्ये आलोक आणि मेहुणी अमिषा यांच्यात भांडण झाले होते. आपल्या मेहुणीने कोणासोबत बोलावे, कोणासोबत बोलू नये यासाठी तो सतत तिच्यावर दबाव टाकायचा. आरोपी हा पीडितेच्या आयुष्यात अनावश्यक ढवळाढवळ करत असल्याने त्यांच्यामध्ये नेहमी वाद व्हायचे. त्यामुळे पीडित मेहुणी ही आरोपीच्या धाकाने वेगळी राहात होती. मात्र, नराधम आलोकने मेहुणी, पत्नीसह 5 जणांची हत्या केली. शिवाय, यानंतर त्यानेही आत्महत्या केली.
चाकूचा धाक दाखवून एकाच कुटुंबातील 6 जणांना बंधक
५ जून रोजी एका माथेफिरूने चक्क यूट्यूब आणि क्राईम शो बघून हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीपळा फाटा या भागातील बांधकाम व्यवसायिक राजू वैद्य यांच्या कुटुंबातील 6 सदस्यांना बंदुक आणि चाकूचा धाक दाखवून बंधक केले होते. आरोपीने अतिशय सुक्ष्म अभ्यास करून हा संपूर्ण कट रचला होता. मात्र, पोलिसांनी देखील अभेद्य किल्ला भेदून सर्व बंधकांची मुक्तता केली.
खुनाच्या घटनेचा व्हिडिओ वायरल
२३ जून रोजी नागपूर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात एका तरुणाची दोन ते तीन आरोपींनी मिळून हत्या केल्याची घटना घडली. योगेश धोंगडे (३०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अनैतिक संबंधातून योगेशची हत्या झाल्याचे बोलले जात आहे. घटनेच्या काही वेळातच योगेशच्या खुनाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये आरोपी योगेशवर सपासप वार करताना स्पष्ठ दिसून येत होते.
गेल्यावर्षी सुद्धा जूनमध्ये १७ खून
गेल्यावर्षी जून महिन्यात एकट्या नागपूर शहरात १७ खुनाच्या घटना घडल्या होत्या. तर, यंदा शहरात 14 खुनाच्या घटना घडल्या आहेत. गेल्यावर्षीपेक्षा यंदा यामध्ये मोठी घट झालेली असली तरी ग्रामीण नागपूरमध्ये महिन्याभरात 5 खून झाले आहेत.
हेही वाचा - मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार!