नागपूर - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा आरोप करत अॅड सतीश उके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज ४ डिसेंबरला प्रथम श्रेणी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना पुढील सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी ४ जानेवारीला होणार आहे. यापूर्वीही फडणवीसांना न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती.
अॅड. सतीश उके यांनी दाखल केलेली याचिका प्रथम श्रेणी दंडाधिकारी न्यायालय आणि उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१९ मध्ये प्राथमिक न्यायालयाने सुनावणी करावी, असे आदेश दिले होते. त्यानंतर प्रथम श्रेणी दंडाधिकारी न्यायालयाने १ नोव्हेंबरला उके यांच्या याचिकेवर पुन्हा सुनावणीस सुरुवात केली. त्यानंतर नियमाप्रमाणे देवेंद्र फडणवीसांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार आज या प्रकरणावर सुनावणी झाली. मात्र, देवेंद्र फडणवीस उपस्थित नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
हे वाचलं का? - अनंतकुमार हेगडेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
आजच्या सुनावणी दरम्यान फडणवीस यांच्या वकिलांनी 4 आठवड्यांचा अवधी न्यायालयाकडे मागितला. देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच राज्याच्या विरोधी पक्षनेते निवड झाली आहे. तसेच 16 डिसेंबरपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी वेळ हवा आहे. फडणवीस यांच्या वकिलांनी केलेल्या मागणीला याचिकाकर्ते उके यांनी विरोध केला. 4 आठवड्याचा अवधी फार जास्त असल्याने केवळ 2 आठवड्यानंतर पुढील सुनावणी घेण्याची मागणी सतीश उके यांनी केली. त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 4 जानेवारीचा दिवस निर्धारित केला. तसेच त्यावेळी फडणवीस यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.