नागपूर - शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूपूर्वी त्या तरुणाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. मात्र, त्याचा अहवाल येण्यापूर्वीच त्या तरुणाचा काल मृत्यू झाला. आज त्या तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने नागपूरकरांची चिंता वाढली आहे.
सतरंजीपुरापासून सुरू झालेली कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाच्या नाकीनऊ आले असताना ही नवीन घटना घडल्याने प्रशासनासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. हा मृत तरुण रामेश्वरी परिसरातील पार्वतीनगर येथे राहत होता. त्याला श्वास घेण्यास अडचण येत असल्याने काल त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कारदेखील करण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण रामेश्वरी परिसर सील केला. मृताच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्यांची तपासणी केली जाणार आहे. मृताचे काका शेजारीच राहत असून ते पोलीस विभागात कार्यरत आहेत. त्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत मृताचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे कामदेखील प्रशासनाने सुरू केले आहे.