नागपूर - मार्च महिन्याच्या तीस दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात तब्बल ७६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर, एप्रिल महिन्याच्या १४ दिवसातच ८०२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे आकडे पाहिले की, परिस्थितीचे गांभीर्य आणि भीषणता लक्षात येते. गेल्या दीड महिन्यात नागपूर जिल्ह्यात १ हजार ५६२ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच सरासरी दररोज ३५ मृत्यू. हे आकडे प्रचंड घाबरवणारे आहेत. रोज इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू व्हायला लागल्याने स्मशानभूमीत आता वेटिंग सुरू होण्याची चिन्ह आहेत.
सध्या रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने नवीन कोरोना बाधित रुग्णांना शहरातील एकाही शासकीय आणि खासगी रुग्णालयात बेड मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता मृत्यूचे आकडे देखील प्रचंड वाढल्याने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील दहन घाट (स्मशान घाट) देखील कमी पडतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका मागे एक मृतदेह स्मशान भूमीत येत असल्याने मनुष्यबळ आणि व्यवस्था देखील अपुरी पडू लागली आहे. शहरातील सर्व प्रमुख दहन घाटांवर २४ तास अंत्यसंस्काराची अग्नी तेवत असल्याने अनेकजण भीतीच्या दडपणाखाली आहेत.
का कोणास ठाऊक नागरिकांना भीतीच नाही -
२०२० हे संपूर्ण वर्ष कोरोनाच्या दहशतीच्या सावटाखाली गेले. २०२१ हे वर्ष सुरू होताच लोकांच्या मनातील भीती कमी होऊ लागली होती. जानेवारी महिन्यात तर अनेक धर्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सर्रासपणे आयोजन केले जात होते. वर्षभर खोळंबलेले हजारो लग्नकार्य देखील फेब्रुवारी महिन्यातच उरकून घेण्यात आली. मार्च महिना उजाडताच लोकांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे या सारखे कोरोना प्रतिबंधक नियम देखील पाळणे सोडून दिले होते. त्यानंतर मात्र, कोरोनाने हळू हळू पुन्हा जम बसवायला सुरुवात केली. एप्रिल महिन्यात कोरोना आटोक्याच्या बाहेर गेला आहे. गेल्या वर्षी कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येकाने संकल्प केला होता. मात्र, यावर्षी जणू कोरोनाला चॅम्पियन बनवायचे असेच नागपूरच्या बेजबाबदार नागरिकांनी ठरवल्याचे चित्र दिसते. ज्यांना अजूनही कोरोनाची दाहकता समजली नसेल, त्यांनी नागपुरातील कोणत्याही स्मशान भूमीला एकदा भेट द्यावी. तिथे जळणाऱ्या चितांची दाहकता आणि सगे-सोयऱ्यांनी राखलेला दुरावा बघितल्यास आपल्याला कोरोनाच्या भयावह परिस्थितीचा अंदाज येईल.
दिवसागणिक वाढतोय मृतदेहांचा आकडा -
नागपूर शहराच्या चहू बाजूने स्मशानघाटांची व्यवस्था आहे. त्यापैकी अंबाझरी, मोक्षधाम, सोनेगाव, नारा घाट, मानकापूर आणि गंगाबाई घाट हे प्रमुख स्मशानघाट आहेत. सर्वात मोठ्या मोक्षधाम आणि गंगाबाई घाटावर तब्बल १५ ते २० ओट्यांची व्यवस्था आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून या ओट्यांवर रचण्यात आलेल्या सरणाची आग थंड होण्या अगोदरच दुसऱ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. ही परिस्थिती शहरातील प्रत्येक स्मशानभूमीत निर्माण झाली आहे. त्यामुळे मनुष्यबळ आणि व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. घाटावर मृतदेहांवर योग्य पद्धतीने आणि त्यांच्या मान्यतेनुसार अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सांभाळणारे शैलेंद्र कोहळे देखील हतबल झाले आहेत. शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे आकडे वाढत असल्याने येत्या काही दिवसात जमिनीवर देखील अंत्यसंस्कार करावे लागतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कोरोना रूग्णांवर अंत्यसंस्कार करताना आता जीवाची भीती वाटू लागल्याचे शैलेंद्र म्हणाले.
नैसर्गिक मृत्यू नंतरची वणवण -
नागपूर शहरात कोरोनामुळे दोन महिन्यात तब्बल १ हजार ५६२ लोकांचा जीव गेला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती भीषण रूप धारण करत आहे. कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या मोठी आहेच, त्याच प्रमाणे नैसर्गिक मृत्यू देखील होत आहेत. त्यामुळे दहन घाटांवर सुरक्षित ओटा शोधण्याची कसरत नैसर्गित मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना करावी लागत आहे.
हेही वाचा - राज्यात 58 हजार 952 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 278 रुग्णांचा मृत्यू