नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी तसेच ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीने बाजी मारली असता भंडारा जिल्ह्यात मात्र, काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासंदर्भात नाना पटोले म्हणाले आहे की भंडारामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपने अभद्र युती करत निवडणूक लढवली होती. अशी अभद्र युती राज्यात एक दोन ठिकाणी झाली असली तरी उर्वरित सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विरोध तीव्र लाट आहे. बाजार समिती निवडणूकीच्या निकालात राज्यात भाजप विरोधात राग पाहायला मिळत आहे असं देखील नाना पटोले म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला अर्थ नाही : मुख्यमंत्री म्हणाले होते की सरकार हे बारसु येथील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल मात्र, त्यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही. बारसुत मी स्वतः जाऊन आलो होतो. कोकणातला माणूस निसर्गप्रेमी आहे, भलेही शहरात जाऊन नोकरी करत असेल तरी सण- उत्सवात कोकणवासीय आपल्या घरी परत जातात. रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा विरोध का आहे? यासाठी सरकारने स्थानिकांशी चर्चा करायला हवी. गुजरात येथील व्यापाऱ्यांसह सरकारच्या बगलबच्चनी बारसुमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी घेऊन ठेवल्या आहेत त्यामुळे त्यांना दहापट मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही : रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोधात करणाऱ्या बारसुमधील लोकांच्या मी घरी जाऊन आलो आहे. त्यांचं नेमके काय म्हणणं आहे, सरकारने आधी समजून घेतले पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांच्याशी चर्चा करावी, आमचा प्रकल्पाला विरोध नाही, पण पर्यावरण आणि नागरिकांचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
सरकार आग्रही का : रिफायनरी प्रकल्प हा कोकणात झाला पाहिजे त्याला कुणाचा विरोध नाही. मात्र, आपल्या लोकांनी घेतलेल्या जमिनींना जास्तीत जास्त भाव मिळावा म्हणून प्रकल्प रेटून धरणे योग्य नाही. विदर्भातील प्रकल्प गुजरातला नेले, पण रिफायणारीचा प्रकल्प कोकणातच व्हावा यासाठी हे सरकार आग्रही का आहे?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आजारी होते तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी काहींनी षड्यंत्र रचण्यास सुरुवात केली होती असा आरोप केला जातो आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले आहे की जर- तर मध्ये आम्हाला जायचे नाही. अवकाळीमुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. जनतेचे प्रश्न आज महत्वाचे आहे, शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेऊन काम करावे, सरकार बेरोजगारीवर सरकार का बोलत नाही, महाराष्ट्राचा तमाशा चालवला आहे अस ते म्हणाले आहेत.