नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी ३०० युनिटच्या खाली आलेल्या वीजबिल दरात ३०% कपात करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ते अजूनही झाले नाही. याच मुद्यावरून नागपुरात आम आदमी पक्षाकडून (आप) मुख्यमंत्र्यांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शहरातील बर्डी पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. शिवाय मुख्यमंत्र्यांना वचननाम्याचा विसर झाल्याचा आरोपही यावेळी आपने केला.
राज्यात वीज बिलाचा मुद्या तापला होता. काही दिवसांपूर्वीच यावरून राज्यभर आंदोलने करण्यात आली. याच मुद्यावरून आता नागपुरात आपकडून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या वचननामा जाहीर केला होता. त्यात ३०० युनिटच्या खाली आलेल्या वीजबिल दरात ३०% कपात करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता आल्यानंतर अद्यापही सर्वसामान्यांना कोणताही दिलास मिळाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोपही यावेळी आम आदमी पक्षाकडून करण्यात आला.
यावेळी शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत वचननाम्याचे फलक दाखविण्यात आले. शिवाय शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांत ही तक्रार दाखल करत मुख्यमंत्र्यांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. याचबरोबर कोरोना महामारीच्या काळातही राज्य शासनाकडून कोणताही दिलास न देता उलट वीजदरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे, असा आरोपही यावेळी आम आदमी पक्षाचे देवेंद्र वानखेडे यांनी केला. त्यामुळे या बाबीची पोलीस प्रशासनाने दखल घेत मुख्यमंत्री विरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणीही यावेळी आम आदमी पक्षाने केली आहे.