नागपूर - नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तथा मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन सुरू आहे. यावर गुरुवारी रात्री वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्यासोबत निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड यांची उशीरापर्यत बैठक झाली. यात त्यांच्या मागणीला हिरवा झेंडा देत कोविड रुग्णांना दुसऱ्या इमारतीत हलवण्यात यावे. तसेच, मागणी नुसार सर्जिकल कॉम्प्लेक्स हे नॉन कोविड रुग्णासाठी खुले करण्यात यावे, अशा सूचना दिल्या. पण मेयोचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून, पुढील निर्णय घेतला जाईल अशी महिती होती.
'अजून निवासी डॉक्टरांचे आंदोलन संपले नाही'
या संदर्भात वैद्यकीय शिक्षण संचालकांच्या बैठकीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. कोरोना नियमांनूसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कोविड रुग्णलय संदर्भात निर्णय घेण्यात येतात. यामुळे अजून निवासी डॉक्टरांचे आंदोलन संपले नाही. जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात यावर आंदोलनाची रूपरेषा ठरेल, असे संघटनेचे नागपूरचे अध्यक्ष डॉ. रजत अग्रवाल यांनी सांगितले. मेयो रुग्णलायत कोविडची परिस्थिती गंभीर झाल्याने सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये 600 बेडेड हॉस्पिटल तयार केले. पण सध्याच्या घडीला अवघे 30 ते 40 रुग्ण असल्याने 500 ते 600 बेड गुंतलेले आहेत. यामुळे ही इमारत इतर रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.
'सर्वांना कोरोना रुग्णांवरच करावे लागतात उपचार'
या निवासी डॉक्टरांमध्ये मेडिसिन, सर्जरी, बालरोग, प्रसूती, नाक, कान, घसा अवयवांच्या विभागाचे वेगवेगळे डॉक्टर असतात. पण मागील 15 महिन्यांपासून मेयो हे कोविड रुग्णालय घोषित झाल्याने इतर आजाराचे रुग्ण येणे बंद झाले. यामुळे त्या त्या विषयाचे तज्ज्ञ होण्यासाठी आलेल्या डॉक्टरांना केवळ कोविड रुग्णाची सेवा करावी लागत आहे. याचा परिणाम त्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रमावर पडला. मागील 15 महिन्यांपासून केवळ कोरोनाचे रुग्ण तपासण्याचे काम असल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचेही, मार्डचे अध्यक्ष डॉ. रजत अग्रवाल यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितले.
'आयसीयूमधील कार्यरत डॉक्टर काम बंद करतील'
रजा आंदोलनात 230 पैकी आयसीयूमध्ये कार्यरत डॉक्टर वगळता जवळपास 200 डॉक्टर या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. गुरुवारी 3 जून पासून 12 नंतर दुपारी आयसीयूमधील कार्यरत डॉक्टर आपले काम बंद करतील, असा इशारा देण्यात आला होता. याबाबत बैठक घेणार असल्याने आयसीयूचेमध्ये कार्यरत डॉक्टर काम करत असले, तरी इतर डॉक्टरांचे आंदोलन जिल्हाधिकारी यांचा आदेश येत नाही तोपर्यंत सुरू राहील, असे सांगण्यात येत आहे.