नागपूर - आम्ही आजही हिंदुत्त्ववादीच आहोत, आम्ही धर्मांतर केलेले नाही. २०१४ ला ज्या पक्षासोबत युती तोडली होती, त्यानंतरही आम्ही हिंदूच होतो. हिंदुत्त्वाचा बुरखा ज्यांनी पांघरला आहे त्यांना आम्ही सोडणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. नागपूरमध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
हेही वाचा - 'अच्छे दिन'बद्दल विचारल्यावर तुमची बोबडी का वळते? ; युती तुटली म्हणजे आम्ही धर्मांतर केले नाही
राहुल गांधींच्या सावरकरांसंदर्भातील विधानवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती. या टीकेला प्रत्यत्तर देताना ठाकरे म्हणाले, की आम्ही आजही हिंदुत्त्ववादीच आहोत. आम्ही धर्मांतर केलेले नाही. २०१४ ला ज्या पक्षासोबत युती तोडली होती, त्यानंतरही आम्ही हिंदूच होतो. हिंदुत्त्वाचा बुरखा ज्यांनी पांघरला आहे त्यांना आम्ही सोडणार नाही. आपलीच सत्ता राज्यावर आहे, हा विश्वास निर्माण करायचा आहे. आपल्याला आधीच्या सरकारसारखे वागायचे नाही. कितीही मोठे झालो तरीही आपण नम्र राहिले पाहिजे. शिवसेना काय आहे, ते सगळ्या देशाला ठाऊक आहे. आम्ही कोणताही बुरखा पांघरलेला नाही, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा - बलात्कारी भाजप आमदाराला न्यायालय कठोर शिक्षा सुनावेल - नवाब मलिक
सोमवारी नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजपाने गोंधळ घातला. शिवसेनेचे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार? असा प्रश्नही विरोधकांनी विचारला असता तुम्ही आम्हाला आमच्या वचनांची आठवण करुन देत आहात, त्याची काहीही गरज नाही. आमचा काही स्मृतीभ्रंश झालेला नाही” असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिले. अच्छे दिन कुठे आहेत हे विचारल्यावर तुमची बोबडी का वळते?” असाही प्रश्नही ठाकरेंनी केला.
दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर मी माझ्या शिवसैनिकांना कुटुंबप्रमुख म्हणून भेटायला आलो आहे. जे शिवधनुष्य हाती घेतले आहे ते तुमच्या सगळ्यांच्या साथीने पेलले आहे. सत्तेचे आव्हान मोठे आहे. मात्र, छोटी आव्हाने आपण स्वीकारत नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण झाले. तुमचा कुटुंबप्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे याचा अभिमान वाटतो असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
- सत्ता आल्यानंतर ना मी बदललो आहे ना तुम्ही बदलला आहात.
- जे शिवधनुष्य मी पेलले आहे त्याला तुमच्यासारखे साथीदार हवे आहेत. पद मोठ आहे, आव्हान ही मोठे आहे.
- विदर्भातील दोन जिल्ह्यांचा आढावा मी घेतला आहे. कामे अजूनही तशीच बाकी आहेत. प्रश्न काही सुटलेले नाहीत.
- राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी आता सरकार म्हणून आपण काम करणार आहोत.
- शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे याला प्राधान्य.
- शिवसेनेचा कुटुंब प्रमुख आज मुख्यमंत्री आहे.
- काल ही आपण हिंदू होतो आजही आपण हिंदूच आहोत हिंदुत्वाचा मुद्दा आपण सोडलेला नाही.
- लोकांचा आशीर्वाद घेऊन नागपूरला मला भगवा करून पाहिजे.
- युती तुटली म्हणजे धर्मांतर केलं नाही.
- गोरगरिबांना आपलं सरकार आलंय असं वाटलं पाहिजे. हे सरकार म्हणजे जनतेच सरकार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज हे सदैव आपले दैवत राहतील.
- कितीही मोठे झालो तरी नम्र राहायचं ही बाळासाहेब यांची शिकवण.
- आधीच्या सरकार सारख वागायचे नाही.
- नोट बंदी नंतर ५० चा पाढा सुरु आहे.
- शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. आम्ही आमची वचन पूर्ण करणार. आमची वचन आम्हाला आठवण करून देण्यासाठी आमचा काही स्मृतिभ्रंश झालेला नाही.
- गोरगरिबांच्या पाठी *'भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे'* असं बोलणार कोणतरी पाहिजे. आम्ही आहोत.
- निर्वासित काश्मिरी पंडितांना हक्काचे घर देण्यासाठी बोलणारे फक्त एकमेव हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे.
- शिवसेना काय आहे आमची ओळख करून देण्यासाठी तुमची गरज नाही.
- गोंधळ घाला आणि गोंधळ मधून सटकून निघून जा असे यांचे धोरण आहे की काय ?
- महाराष्ट्र आज देशाला दिशा दाखवायला निघालेला आहे.
- शिवनेरी किल्ल्यावरील एक मूठ माती आयोध्या ला घेऊन गेल्यानंतर एका वर्षाच्या आत निकाल लागला. ही माझी श्रद्धा आहे. शिवनेरीच्या पवित्र माती मध्ये तेज आहे.
- सत्ता आल्यानंतर उतू नका मातू नका हातामध्ये घेतलेला वसा सोडू नका.