नागपूर CM Eknath Shinde On Farmers : सध्या राज्यातील बळीराजा गारपीट आणि दुष्काळामुळं हवालदिल झाला आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला असून, बळीराजा सरकारी मदतीकडे डोळे लावून बसला आहे. शेतकरी मदतीवरुन सत्ताधारी-विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप आणि टीका-टिप्पणी होत आहे. हिवाळी अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्यातील मंगळवारी चौथ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील चर्चेदरम्यान विरोधक आक्रमक झाले. त्यांनी सत्ताधाऱ्यांना या प्रश्नावरुन घेरण्याचा प्रयत्न केला. शेतकरी संकटात असताना, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारची उदासीनता दिसून येत असल्याची टीका विरोधकांनी केलीय.
शुक्रवारी मुख्यमंत्री मदतीची घोषणा करणार : शेतकरी प्रश्नांवरुन विरोधक आक्रमक होत, सरकारवर टीका केली. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत एवढी माहिती देऊन सुद्धा सरकारकडून कोणतीही मदत जाहीर केली जात नाही. त्यामुळं सरकार अजून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाट पाहत का? असा संतप्त सवाल विरोधकांनी केलाय. याला उत्तर देताना मंत्री अनिल पाटील म्हणाले की, शुक्रवारपर्यंत सर्व पंचनामे प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सभागृहात मदतीची घोषणा करतील.
विरोधकांची मागणी काय : अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि गारपीट यामुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु सरकारकडून मदतीची कोणतीच हालचाल दिसत नाही. यावरुन विरोधकांनी विधानसभेतील सभागृहात सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार केला. यानंतर कोणताही शेतकरी मदतीबाबत वंचित राहणार नाही, नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळेल, असं मंत्री अनिल पाटील म्हणाले. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट सरकारकडून मदत मिळाली पाहिजे. ही मदत जिरायतीसाठी प्रति हेक्टर ५० हजार रुपये आणि बागायतदारांसाठी प्रति हेक्टर १ लाख रुपये जाहीर केली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली.
हेही वाचा -
- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक, दिल्ली दरबारी सत्ताधारी नेत्यांच्या भेटीगाठी
- राज्यात दुष्काळ, महागाई, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर; सरकारला विचारणार जाब - विजय वडेट्टीवार
- Drought In Nashik District : विरोधक आक्रमक झाल्यानं सरकार नमलं: अखेर 'हे' तालुके दुष्काळसदृष्य जाहीर झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा