नागपूर - आरडीएसओ संस्थेतर्फे सुरू असलेले मेट्रोचे परीक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे अस्सल नागपुरकरांनी मेट्रोचे स्वागत करताना नागपुरी भाषेत टोमणे लगावले. सध्या या टोमण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातून मनोरंजन होत आहे.
नागपूरकर आपल्या बोलीभाषेकरता प्रसिद्ध आहेत. प्रेमळ रसाळ आणि तेवढीच खोचक असलेल्या नागपुरी भाषेचे अनेक दर्दी आहेत. मध्यंतरीच्या काळात नागपुरी भाषेत क्रिकेट कॉमेंट्री यासह चित्रपटांचे डायलॉग्स असणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. त्यावेळी प्रत्येक मराठी माणूस आवर्जून हे व्हिडिओ लाईक करायचा. मात्र, सोमवारी मेट्रोची ट्रायल रन सुरू असताना काही उत्साही नागपुरकरांची प्रतिक्रियांचे व्हिडिओ समोर आले आणि ते पाहणाऱ्यांना हसू आवरले नाही.
नागपूर मेट्रो
मेट्रोचा ट्रायल सुरू असल्याने अत्यंत कमी वेगात मेट्रो धावत असल्याचे बघून उत्साही नागपूरकरांना राहावले नाही. त्यांनी थेट लोको पायलटलाच स्पीड वाढवण्याची विनंती केली. एअरपोर्ट साऊथ ते अजनीच्या काँग्रेसनगर चौकापर्यंत मेट्रोची ट्रायल सुरू होताना एका नागरिकाने तर व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला. यामध्ये एवढ्या कमी गतीने मेट्रो धावत असेल तर बर्डीपर्यंतचे अंतर केव्हा कापणार, असा प्रश्न करून त्याने मेट्रोच्या अधिकाऱ्यांना टोमणा मारला.