नागपूर - राज्य शासनाने सिनेमागृह व नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, नागपूरात सिनेमागृह सुरू करण्यावरून संभ्रम व चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील जवळ जवळ ८० टक्के सिनेमागृह अद्यापही बंदच असल्याचे दिसून येत आहे. तर काही सिनेमागृहांमध्ये शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व्यवस्था करण्याचे काम सुरू आहेत. त्यामुळे नागपुरातील सिनेमागृह नेमके कधीपर्यत पूर्णतः सुरू होईल, हे अद्यापही अस्पष्टच आहे.
गेली काही महिन्यांपासून बंद असलेली सिनेमागृहे आजपासून सुरू झाली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मार्गदर्शक तत्वानुसार ही सिनेमागृहे सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. मात्र, नागपुरातील बहूतांश सिनेमागृहे अद्यापही बंदच आहेत. अनेक सिनेमागृहांबाहेर शुकशुकाट पहायला मिळत आहे. तर शहरातील काही सिनेमागृहाच्या चालकांकडून तुटपुंजे का होई ना, स्वच्छतेचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इतर शहरांपेक्षा नागपुरातील सर्व सिनेमागृहे कधीपर्यंत सुरू होईल हे सांगता येणे सध्या तरी अशक्यच आहे. शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शहरातील काही सिनेमागृहात साफसफाईसह सॅनिटायझेशनचे काम सुरू आहेत. तर बहूतांश सिनेमागृहे अजूनही टाळेबंदच असल्याचे दिसून येत आहे. शिवाय सिनेमागृहे सुरू करण्यासाठी चालक म्हणून आम्ही तयार आहोत, परंतु प्रेक्षक येतील की नाही, याची शाश्वती देता येणार नाही, अशी प्रतिक्रिया सिनेमागृह व्यवस्थापकांनी दिली आहे. असे असले तरी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आम्ही तयारी करतो आहे. मात्र, लोकांचा या निर्णयाला किती प्रतिसाद मिळतो, हे सध्या तरी सांगता येणार नाही, असेही सिनेमागृह व्यवस्थापकाचे मत आहे. त्यामुळे सिनेमागृहे सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली खरी; परंतु सिनेमागृह चालकांमध्ये अजूनही संभ्रम कायम असल्याचे दिसून येत आहे.