औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील चिकलठाणा येथे आग लागून चार दुकाने जळाल्याची घटना घडली. या आगीत दुकानाचे मोठ्ठे नुकसान झाले. दरम्यान, नागरिकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने परिसरात असलेल्या आणखी दुकाने वाचली. ही घटना आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली असून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
कन्नड तालुक्यातील चिकलठाणा भागात रस्त्यावर असलेल्या एका दुकानाला आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही मिनिटात या आगीने आजूबाजूच्या इतर चार दुकानांना वेढले. आग लागल्याचे समजताच नागरिकांनी धाव घेत घरातील पाणी आणून ही आग नियंत्रणात आणली.
दुकाने लाकडी असल्याने आगीत पूर्ण जळून खाक झाली. या आगीत मोठे नुकसान झाले असून नुकसानीचा नेमका आकडा समोर आलेला नाही. आगीची माहिती औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना देण्यात आली आहे. पंचनामा झाल्यावरच नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार आहे.