नागपूर- उपराजधानी नागपूरात फसवणुकीचा आणखी एक अजब प्रकार समोर आला आहे. डोक्याचे तेल विकणाऱ्या दोघांनी महिलेला भीती दाखवून फसवणूक केली आहे. तुमच्या मुलाला भूत बाधा झाली आहे, तुमच्या घरात गुप्त धन आहे, त्यावर शेष नागाच विष आहे ते काढून देतो या पूजेसाठी ४ लाख रुपये लागतील. अशा प्रकारे भीती दाखवून महिलेची १ लाख रूपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी भोंदू बाबाला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे. राज साहेबराज मंदी उर्फ गिरी महाराज (२५) असे त्या मांत्रिकाचे नाव असून तर त्याचा एक साथीदार आरोपी फरार आहे.
महिलेच्या भाभडेपणाचा गैरफायदा
तक्रारदार महिला ही गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा परिसरात राहते. दोन दिवसांपूर्वी दोन इसम तेल विकण्याचा बहाण्याने आले होते. यावेळी त्या महिलेच्या भाभडेपणाचा गैरफायदा घेऊन आरोपींनी तिला भीती दाखवायला सुरवात केली. महिला आपल्या जाळ्यात अडकत असल्याचे दिसताच आरोपींनी महिलेला विश्वसात घेतले. तुझ्या मुलाला भूतबाधा झाली आहे, तुझ्या घरात गुप्त धन असून त्यावर शेष नागाचे विष आहे. ते आम्ही काढून देतो त्यासाठी देवाच्या जवळ पूजा करावी लागेल, त्यासाठी चार लाख रुपये खर्च येईल असे सांगितले. गुप्तधन मिळणार या लालसेने महिलेनेदेखील तिच्या जवळ असलेले एक लाख रुपये दोघांच्या स्वाधीन केले. उर्वरित रक्कम पूजा झाल्यानंतर देण्याचं ठरले होते. त्यानंतर ते भोंदू बाबा पूजा करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने त्या महिलेला संशय आल्यामुळे त्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार नोंदवली. पोलिसांनी देखील तक्रारीची तत्काळ दखल घेत एका आरोपीला अटक केली आहे.
फसवणूकीच्या बाबतीत नागपूर अव्वल
ऑनलाइन फसवणूक असो की फेसबुक फ्रेंडकडून होणारी फसवणूक या साऱ्या घटनांमध्ये नागपूर सर्वात पुढे असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी परदेशात राहणाऱ्या महिला फेसबुक फ्रेंडकडून जेष्ट नागरिकांची फसवणूक झाली होती. त्यानंतर आता भीती दाखवून फसवणूक करण्याचा प्रकार पुढे आल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.