नागपूर - 'देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी नेत्यांना पुढे नेण्याचेच काम झाले आहे. त्यामुळे ओबीसी नेते नाराज असण्याचा प्रश्नच उद्भवायला नको. ओबीसी, मराठा, ब्राम्हण अशा समाजाच्या भूमिका न घेता महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करावा', असा टोला माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडेंना लगावला आहे. पंकजा यांनी गुरुवारी (12 डिसेंबर) बीड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पक्षांतर्गत वादावर भाष्य केले होते. यापूर्वी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी देखील पंकजा यांच्या भाषणावर टीका केली आहे.
हेही वाचा - सत्ता असतानाही स्वतःचा मतदारसंघ सांभाळू शकला नाहीत; खासदार काकडेंची पंकजा मुंडेंवर टीका
बावनकुळे हे विदर्भातील ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. मुंडे, खडसे पक्षाच्या विरोधात नाराजी व्यक्त करत असताना बावनकुळे यांनी मात्र पक्षाची बाजू उचलून धरली आहे. कुठल्याच नेत्याने एका विशिष्ट समाजाची भूमिका न घेता पक्षाला मोठे करण्यासाठी काम करावे, असा सल्लाही बावनकुळे यांनी दिला आहे. ओबीसी समाज भाजपवर नाराज नसल्याचा दावाही बावनकुळे यांनी यावेळी केला आहे.