नागपूर - उमरेड-नागपूर महामार्गावर चांपा गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या इंडिका कारने पेट घेतल्याची घटना घडली. कारची पेट्रोल टँक लीक झाल्याने घटना घडल्याचे बोलले जात आहे. यामध्ये कार संपूर्ण जळून खाक झाली. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.
कारचे मालक मारोती शिवराम फुलझेले हे नागपूरवरून उमरेडला जात होते. त्यावेळी त्यांच्यासह ३ व्यक्ती गाडीमधून प्रवास करीत होते. त्यांची गाडी चांपा गावाजवळ येताच गाडीमधून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्वांना गाडीच्या बाहेर काढले. त्यामुळे जीवितहानी टळली असून सर्व व्यक्ती सुखरूप आहेत.