नागपूर - यंदा अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून अद्याप उभरले नसताना शेतकऱ्यांसमोर बोंडअळीचे संकट उभे ठाकले आहे. बोंडअळीमुळे सावनेर, काटोल, कळमेश्वरसह इतर तालुक्यातील कापसाच्या पिकाचे नुकसान होऊन उत्पन्नात घट झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
वाढती थंडी बोंडअळीसाठी पूरक वातावरण निर्माण करत आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील कापूस पिकाला नुकसान होत आहे. दरवर्षी एकरी १५ ते २० क्विंटल कापसाचे उत्पन्न व्हायचे. परंतु, यंदा त्यात घट होऊन उत्पन्न एकरी ६ ते ७ क्विंटलवर आले आहे. त्यामुळे, शेतकरी चिंतेत सापडला आहे. आधीच परतीच्या पावसात सोयाबीन पीक गेले, आणि आता कसेबसे वाचवलेले कापूस पीक बोंडअळीच्या घशात जाताना शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे.
एकूण ३ हजार ५०० हेक्टरवर बोंडअळीचा प्रभाव
जिल्ह्यातील एकूण ३ हजार ५०० हेक्टरवरील कपास पिकावर बोंडअळीने हल्ला केला आहे. त्यामुळे, इतक्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या नुकसानीची भरपाई कशी होणारी, ही चिंता शेतकऱ्यांना अस्वस्थ करत आहे. आधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. त्याचा खर्च या तुटपुंजा कापसाच्या उत्पन्नातून कसा निघणार ? असा सवाल शेतकरी करत आहे. शिवाय पुढील पिकाच्या नियोजनासाठी कमी किंमतीत कापूस विकावे लागत आहे. त्यामुळे, एकीकडे निसर्ग, तर दुसरीकडे पिकाला न मिळणारा अपेक्षित भाव, यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - नागपूर पदवीधर निवडणुकीची अंतिम टक्केवारी जाहीर; विभागात ६४. ३८% मतदान