नागपूर - कोविड सेंटरमधून रेमडेसिवीर इंजेक्शन चोरून त्याचा काळाबाजार करणारी एक परिचारिका आणि तिच्या प्रियकराला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. ज्योती अजित असे अटक करण्यात आलेल्या परिचारिकेचे नाव असून शुभम अर्जुनवार असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. वाठोडा पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
उपराजधानी नागपूर मध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या अनेकांना अटक केली आहे. यामध्ये डॉक्टर, वॉर्ड बॉयसह वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांचा समावेश आहे. संपूर्ण जिल्ह्यात काळाबाजार करणाऱ्यांचा सुळसुळाट असल्याने पोलिसांनी त्या अनुषंगाने कारवाई करण्यास सुरुवात केली. दरम्यान ज्योती नामक महिला परिचारिका या कामात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
कोविड सेंटर मधून चोरायची इंजेक्शन
ज्योती ही नागपूर जिल्ह्यतील बुटीबोरी येथील एका कोविड सेंटरमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती. त्याठिकाणी आलेले रेमडेसिवीर इंजेक्शन चोरून ती आपल्या प्रियकर शुभमच्या मदतीने ब्लॅकमध्ये विकायची. वाठोडा स्मशानभूमीबाहेर रविवारी संध्याकाळी शुभम रेमडेसिवीर विकताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्याला पकडून झडती घेतली. पोलिसांना रेमडेसीवीरसह पाच विविध अत्यावश्यक व्हायल्स त्याच्याकडे सापडले. चौकशी केल्यानंतर त्याच्या मैत्रिणीने कोविड सेंटरमधून रेमिडेसिवीर चोरल्याची माहिती पोलिसांना त्याने दिली. ज्योतीने रेमिडेसेवीर चोरल्यानंतर शुभम ते इंजेक्शन ब्लॅकमध्ये विकत होता. वाठोडा पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.