नागपूर - राज्य सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत असल्याचा आरोप करत भाजपा युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले. शहरातील आकाशवाणी चौकात आज (शनिवारी) हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात गळ्यात पेग्विंनचे पोस्टर घालून राज्य शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. समीत ठक्करला राज्य शासनाकडून चूकीची वागणूक दिल्या जात असल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
काही दिवसापूर्वी समाज माध्यमांवर समीत ठक्कर या तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर या प्रकरणी ठक्करला अटक करण्यात आले. मात्र, अटक झाल्यानंतर समीत ठक्कर चुकीची वागणूक दिल्या जात असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाकडून करण्यात आला. शिवाय राज्य सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत आहे. हे सत्तेचा दुरुपयोग करत आहेत, असा आरोपही यावेळी भाजपा युवा मोर्चाकडून करण्यात आला.
हेही वाचा - अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण उपसमितीवरून हटवा - विनायक मेटे
दरम्यान, अभिव्यक्ती बाबतचे नियम स्वतःसाठी वेगळे आणि इतरांसाठी वेगळे कसे? असा सवालही यावेळी युवा मोर्चाच्या महामंत्री शिवानी दाणी यांनी उपस्थित केला. तसेच समीत ठक्कर दोषी आहे कि नाही? हे न्यायालय ठरवेल. मात्र, त्या आधीच सरकारकडून त्याला दिलेली वागणूक चुकीची आहे. समीत ठक्करच्या कृत्याचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखण्यासाठी हा निषेध व्यक्त करत असल्याचे यावेळी दाणी म्हणाल्या.