नागपूर - गेल्या काही दिवसांमध्ये नागपुरात गुन्हेगारी घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. केवळ २४ तासाच्या अंतरात दोन खुनाच्या घटनांनी उपराजधानी हादरून गेली आहे. नागपुरातील भूतेश्वर नगर परिसरात एका तरुणाची हत्या झाली आहे. राज डोरले असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून आहे तो भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचा कार्यकर्ता होता. जुन्या वादातून त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुकेश नारनवरे आणि सारंग बावनकुळे या दोन मित्रांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यावेळी राज डोरलेने सारंगची बाजू घेतली होती. त्याचा राग मुकेशने धरला होता. त्याच रागातून मुकेशने काल मध्य रात्री अंकित चतुरकर या मित्राच्या मदतीने राजच्या डोक्यावर लाकडी बॅटन आणि चाकूने वार करत त्याची हत्या केली. राजच्या हत्येनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आरोपी मुकेश नारनवरे आणि सहआरोपी अंकित चतुरकर याला अटक केली आहे.