नागपूर Jitendra Awhad : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक झाली. त्यात भाजपानं लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आता स्वबळावरच लढवावी, असा सल्ला 'आरएसएस'कडून देण्यात आला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'एक्स' (ट्विटर) वर केला आहे.
माझे आणि 'आरएसएस'चे अत्यंत जास्त जवळचे संबंध : हा दावा कोणत्या आधारे केलाय असं विचारलं असता ते म्हणाले की, माझं आणि आरएसएसचं अत्यंत जास्त जवळचे संबंध आहेत. त्यामुळं मला माहिती मिळाली असं उत्तर त्यांनी दिलंय. ज्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची लढाई लढली, त्यांनाचं सत्तेत सहभागी करून घेतलं. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या पारंपरिक मतदारांमध्ये तीव्र नाराजी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी : पुणे विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मंथन सुरू झालं होतं. मात्र, नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये भाजपाला तीन राज्यात स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी, असा सल्ला 'आरएसएस'कडून देण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय.
निवडणूक कोणत्या चिन्हावर लढवणार? : शिवसेना शिंदे गट आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) भाजपाच्या कमळ चिन्हावर लढण्याची शक्यता आहे, असं विरोधकांनी म्हटलं आहे. तीन राज्यांच्या निवडणुकीचा एकंदरीत कल पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांना अधिक फायदा होईल, असं शिंदे गटातील काही खासदारांना वाटतंय. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना (शिंदे गट) कोणत्या चिन्हावर लढवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -
“जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, अजित पवार गटाची आव्हाडांवर जहरी टीका
NCP President Row : राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण? अजित पवार म्हणाले, निवडणूक आयोगानं...