मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकी मधील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यावरून भाजपने आता आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशाराही दिला आहे. तसेच जोपर्यंत हा ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे.
नागपुरात फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन -
ओबीसी समाजाच्या हक्कांचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळावे, अशी भाजपची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) सकाळपासून राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी राज्यातील विविध भागात प्रमुख नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये चक्का जाम करण्यात येणार आहे.
हेही वाचा - पावसाळी अधिवेशन : महाविकास आघाडीला घेरण्याचा भाजपचा प्रयत्न
विविध नेते राज्यातील विविध ठिकाणी या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरातून नेतृत्व करतील. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जालन्यातून आंदोलन करणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे पुण्यातून आंदोलनात सहभागी होतील. मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप नेते आशिष शेलार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे मुंबईतून या आंदोलनात उतरणार आहेत. माजी मंत्री गिरीश महाजन जळगावात आंदोलनाचे नेतृत्व करतील. भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली त्या त्या भागात आंदोलन करण्यात येणार असल्याने आता राज्य सरकारदेखील सावध भूमिका घेताना दिसत आहे.