नागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला निर्माण होत असलेल्या राम मंदिरासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली. मात्र, रामटेक येथील गड मंदिराच्या निधीत कपात करून राम भक्तांच्या अपेक्षांचा भंग केल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच अयोध्येला जावून रामाचे दर्शन घेऊन परत आले आहेत. त्यावेळी त्यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. त्यावरूनच चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रामटेक येथील गडमंदिर येथे प्रभू रामचंद्रांचे पदस्पर्श झाले होते. त्यासाठी सरकारने दीडशे कोटीचा विकास आराखडा मंजूर केला होता. मात्र, त्याचा निधी अद्याप मिळाला नाही. त्यामुळे गडमंदिराचे विकासकामे थांबले आहेत. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा, असे बावनकुळे म्हणाले.