नागपूर - राज्याचे ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून लोणावळा येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची दोन दिवसीय चिंतन बैठक सुरू आहे. आज (26 जून) पहिल्याच दिवशी अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माजी मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'चंद्रशेखर बावनकुळे हे मला भेटायला आले होते. तेव्हा त्यांनीच ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर सही करू नका असा सल्ला दिला होता', असे भुजबळांनी म्हटले. यावर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.
बावनकुळेंचा भुजबळांवर हल्लाबोल
'छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांना या वयात रेटून खोटं बोलावं लागत आहे. २०१८ मध्ये जेव्हा ही घटना घडली होती, तेव्हा छगन भुजबळ हे कारागृहात होते. त्यांच्या अशा बोलण्याची कीव येते. राज्यात त्यांची सत्ता आली तेव्हा मी त्यांना भेटून ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश रिन्यू करण्याची आठवण करून दिली होती. ओबीसी समाजाच्या राजकिय आरक्षणाचा मुद्दा त्यांच्यावर उलटला असल्याने ते खोटं बोलून स्वतःला सुरक्षित करू पाहत आहेत', असा हल्लाबोल बावनकुळेंनी केला आहे.
'...तरीही ओबीसी चिंतन बैठकीला जाणार'
'राज्याचे ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मला या बैठकीत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. त्यावेळी, त्यांनी मला ही राजकीय बैठक नसून पुढील दिशा ठरवण्यासाठी सर्व ओबीसी नेत्यांनी एकत्र चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. मात्र आज छगन भुजबळ यांनी चिंतन बैठकीच्या मंचावरून राजकीय आरोप केले आहेत. त्यामुळे हे राजकीय व्यासपीठच वाटत आहे. तरीदेखील मी या बैठकीला उपस्थित राहणार आहे', असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - कोरोनाचे नियम पायदळी तुडवत भाजपाचे आंदोलन, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर घणाघात