नागपूर - कोरोना प्रतिबंधक लसीची सर्वांनाच आस लागली आहे. भारत बायोटेक या औषधनिर्माण कंपनीकडून संपूर्ण भारतात ८ ठिकाणी लसीबाबत संशोधन सुरू आहे. नागपुरातही गिल्लूरकर रुग्णालयात कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचे कार्य सुरू आहे. या चाचणीचा दुसरा टप्पा सुरू झाला असून यात ५० स्वयंसेवकांना ही लस देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ५५ व्यक्तींना ही लस देण्यात आली होती. त्यानंतर आता पुढील टप्प्याला सुरुवात झाली आहे. शिवाय या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्याचे डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी सांगितले.
भारतातील ८ ठिकाणी या लसीच्या मानवी चाचणी केल्या जात आहेत. यात नागपुरातील गिल्लूरकर रुग्णालयाचा समावेश आहे. या लसीच्या चाचणीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. शिवाय पहिल्या टप्प्यातील सकारात्मक बदलसुद्धा दिसून आल्याचे डॉ. गिल्लूरकर यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यातही नक्कीच यश मिळेल असेही सांगितले जात आहे. या संशोधनात १२ ते ६५ वयोगटातील ५० व्यक्तींना ही लस देण्यात येत आहे. यामध्ये २२ महिला आणि २८ पुरुषांचा समावेश आहे. पहिल्या टप्यात ५५ व्यक्तींवर ही चाचणी यशस्वीपणे करण्यात आली होती. त्यामध्ये लसीचा कोणताही दुष्परिणाम दिसून आलेला नाही. ही लस सुरक्षित असल्यामुळेच आता दुसरा टप्पा सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ. गिल्लूरकर यांनी दिली.
हेही वाचा - 'मास्क घाला' म्हणणाऱ्या डॉक्टरला मारहाण; नागपूरमधील प्रकार
देशात पहिल्या टप्प्यात १२ केंद्रांवर मानवी चाचणी सुरू करण्यात आली. राज्यात केवळ नागपूर येथील गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा यात समावेश करण्यात आला आहे. २८ ते ३१ जुलै या कालावधीत पहिला डोस देण्यात आला होता. त्यानंतर ११ ते १४ ऑगस्ट दरम्यान लसीचा दुसरा डोस देण्यात आला. त्यानुसारच लसीच्या निष्कर्षापर्यंत पोहचण्यासाठी 14, 28 व 42 दिवसांनंतर संबंधित व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी डॉ. गिल्लूरकर यांनी दिली.
कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या टप्यासाठी देशातील केवळ ८ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. यात पुन्हा नागपुरातील या रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या डोसचा कुणालाही 'साईड इफेक्ट्स' झालेला नसून कुणालाही कोणताही त्रास झालेला नाही, असे डॉ. गिल्लूरकर यांनी सांगितले. शिवाय पहिल्या टप्प्याचा निकाल चांगला असल्यामुळेच दुसऱ्या टप्प्याची परवानगी सरकारने दिली असल्याचे ते म्हणाले. कोव्हॅक्सिन लसीची मानवी चाचणी नागपूरसह संपूर्ण देशात सुरू आहे. त्यामुळे सर्वकाही व्यवस्थित राहिले तर सर्वसामान्य नागरिकांना येत्या डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकते, असे डॉ. गिल्लूरकर म्हणाले.
हेही वाचा - नागरिकांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळेच नागपुरात मृत्यूदर वाढतोय