नागपूर - शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौशल्या नगरात शुक्रवारी रात्री उशीरा स्वयंदीप नगराळे (२१) नामक एका तरुणाचा खून झाला होता. त्याच परिसरात राहणाऱ्या शक्तिमान नामक आरोपीने स्वयंदीपचा खून केला. स्वयंदीपच्या खुनाचा बदला घेण्यासाठी स्वयंदीपच्या मित्रांनी शनिवारी सकाळी शक्तिमानला हुडकून काढलं आणित्याच्यावर हल्ला केला. शक्तिमानचा मृत्यू झाला असे समजून स्वयंदीपच्या मित्रांनी पळ काढला. अजनी पोलिसांना घटनेची माहिती समजताच घटनास्थळ गाठले. मात्र, शक्तिमान जिवंत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची तब्येत अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, स्वयंदीप नगराळे आणि आरोपी शक्तिमान हे दोघेही अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौशल्या नगर येथे राहतात. स्वयंदीप हा पेंटिंगचं काम करायचा तर आरोपी शक्तिमान हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने परिसरात दहशत निर्माण करायचा. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची तो छेडदेखील काढायचा. त्यामुळे स्वयंदीप त्याला नेहमी विरोध करत हटकायचा. ज्यामुळे स्वयंदीप आणि शक्तिमान या दोघांमध्ये वैर निर्माण झाले होते. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास स्वयंदीप जेवण झाल्यानंतर फिरायला घराबाहेर पडला होता. तो घराबाहेर उभ्या असलेल्या एक ऑटोमध्ये जाऊन बसला असताना आरोपी शक्तिमान त्याच्या काही साथीदार घेऊन स्वयंदीप ज्या ऑटोमध्ये बसला होता त्याठिकाणी आले. कुणालाही काही कळण्यापूर्वीच आरोपींनी स्वयंदीपवर धारधार शस्त्रांनी वार केले. यामुळे स्वयंदीपचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती कळताच, अजनी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. स्वयंदीपच्या हत्येनंतर अवघ्या काही तासातच स्वयंदीपच्या मित्रांनी शक्तिमानवर प्राणघातक हल्ला केला. मात्र, या हल्ल्यात तो थोडक्यात बचावला असून त्याच्यावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर, चिपळूणसह इतर पूरग्रस्त भागात करणार पाहणी
अजनी पोलिसांचे नेटवर्क फेल -
स्वयंदीपच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले होते. मात्र, मुख्य आरोपी शक्तिमान पोलिसांना मिळून आला नव्हता. स्वयंदीपच्या हत्येनंतर कौशल्या नगर परिसरातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यातच शक्तिमान हा त्याच्या नातेवाईकाच्या घरी लापलेला असल्याची माहिती स्थानिकांना समजली. काहींनी शक्तिमानला हुडकून काढले आणि त्याला जबर मारहाण केली. यात शक्तिमान गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर कौशल्या नगरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण प्रकरणात अजनी पोलिसांचे नेटवर्क अपयशी ठरले आहे.