नागपूर - शहरात शेतकऱ्यांचे पशुधन चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच कारमध्ये गायी घालून नेल्या जात असल्याचा घटना उजेडात आल्या होत्या. याबाबत पोलिसांनी एका टोळीच्या मुसक्या देखील आवळल्या होता. मात्र, आता पुन्हा गायींची चोरी करणाऱ्या टोळ्या ग्रामीण भागात सक्रिय झाल्या आहेत.
नागपूरच्या सीमावर्ती भागांमध्ये असलेल्या वस्त्यांमधून गायी चोरण्याचे प्रकार सर्रासपणे होत आहे. अगोदरच लॉकडाऊनच्या कचाट्यात अडकल्याने शेतीची घडी विस्कटली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यात जनावरेही चोरीला जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
वाडी परिसरातील जनावरे चोरीच्या काही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहे. काही सेकंदाच्या आतच चोर अंगणात बांधलेल्या गायी चोरून नेताना दिसत आहेत. त्यानंतर गायी मिनी ट्रकमध्ये टाकून आरोपी पसार झाल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. वाडी आणि लाव्हा या दोन गावातून तस्करांनी शनिवार व रविवार ८ गायी चोरून नेल्या आहेत. या घटनेची तक्रार वाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.