नागपूर - मुक्या प्राण्यांवरही तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच उपचार करणे गरजेचे असते. मात्र, डिप्लोमाधारक आणि पशुवैद्यकीय दवाखान्यात परिचारक म्हणून काम करणाऱ्या एलएसएस कर्मचाऱ्यांना पशुवैद्यकीय डॉक्टर श्रेणी १ आणि २ अशी पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विरोधात गुरुवारी पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले.
राज्याचे मंत्री महादेव जानकर यांच्या विरोधात पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले आहे. या विद्यार्थ्यांनी थेट महादेव जानकर यांना प्रश्न विचारला आहे. तुम्ही तुमचे उपचार एखाद्या कंपाउंडर किंवा परिचारकाकडून करून घेणार का? मग मुक्या प्राण्यांवर कंपाउंडरकडून उपचार करून घेण्याची वेळ का आणता.
महाराष्ट्र शासनाने नुकतेच डिप्लोमाधारक आणि पशुवैद्यकीय दवाखान्यात परिचारक म्हणून काम करणाऱ्या एलएसएस यांना पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी १ आणि २ अशी पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाला तुघलकी निर्णय असल्याचे सांगत आज नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी शासनाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते.
सुमारे साडेपाच वर्ष पशुवैद्यक म्हणून अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांवर हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. शिवाय या निर्णयामुळे महाराष्ट्रातील पशुधनाचे आयुष्यदेखील धोक्यात येणार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. पहिल्या टप्प्यात ३ दिवस लाक्षणिक संप असेल त्यानंतरही शासनाने आपला तुघलकी निर्णय मागे घेतला नाही, तर अनिश्चित कालीन संप पुकारण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.