नागपूर - तू माझा शारीरिक आणि मानसिक छळ करतो, मी आता दुसरे लग्न करेल, अशी पत्नीने धमकी दिल्यानंतर संतप्त झालेल्या पतीने भर रस्त्यात पत्नीवर चाकूने हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. अचानक पतीने हल्ला केल्यामुळे पत्नीने आरडाओरड केल्या नंतर धावून आलेल्या नागरिकांमुळे पत्नीचा जीव वाचला. ही घटना नागपूर शहरातील बाजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणाची तक्रार दाखल होताच आरोपी पती सूर्यकांत शाहू याला बजाज नगर पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा - नागपूर : सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडाचा खून
आरोपी सूर्यकांत शाहूचे इशिता उईके यांच्यासोबत 2 वर्षाआधी प्रेम विवाह झाला होता. लग्नाच्या काही महिन्यानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागला. नवऱ्याकडून इशिताचा मानसिक आणि शारीरिक छळ व्हायला लागल्याने कंटाळून इशिता माहेरी आली. या दरम्यान दोघांमध्ये संपर्क सुरू होता. दरम्यान, रविवारी फोनवर बोलत असतना इशिताने, तू माझा छळ केला म्हणून मी आता दुसरे लग्न करणार असल्याचे सांगितले. या विषयावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संतापलेल्या सूर्यकांतने इशिता कामावरून घरी परत जात असताना रात्री 11 वाजता लक्ष्मीनगर भागात तिच्यावर हल्ला केला.
हल्ल्यात इशिताच्या हनुवटीवर, हातावर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या असून तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर सूर्यकांतला पोलिसांनी ताब्यात घेतल असून पुढील कार्यवाही केली जात आहे.
हेही वाचा - नागपूरात मॅफेडॉन अमली पदार्थांसह दोघांना अटक