नागपूर - म्यूकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असताना प्रभावी समजले जाणारे अॅम्फोटेरिसीन बी हे औषध मिळणे कठीण झाले आहे. यामुळे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र मेल करून मदतीची मागणी केले. मात्र 14 दिवस लोटून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कुटुंब हताश झाले आहे. स्वप्निल भांडारकर असे रुग्णाचे नाव असून बहीण हर्षला खेडीकर (भांडारकर) यांनी हे पत्र लिहिले आहे. हर्षला यांचे पती चेतन खेडीकर यांनी 'ईटीव्ही भारत' समोर आपली व्यथा मांडली आहे.
कोण आहे स्वप्निल?
नागपूर येथील स्वप्निल भांडारकरला कोरोनाने ग्रासले. यानंतर त्यांना काही दिवसात दवाखान्यात असताना म्यूकरमायकोसिसने ग्रासल्याचे उघडकीस आले. यामुळे त्यांच्यावर म्यूकरमायकोसिसचे उपचार सुरू झाले. सुरुवातीला 4 मे रोजी सर्जरी करण्यात आली. यात फंगस काढण्यात आले. यानंतर पुन्हा इंफेक्शन डोक्यापर्यंत जात असल्याचे लक्षात आल्याने त्यावर पुन्हा 14 मे रोजी सर्जरी करण्यात आली. या सर्जरीनंतर रुग्ण स्वप्निलला दररोज अँटीफंगल सहा इंजेक्शन मिळणे गरजेचे होते. इंजेक्शनचा तुटवडा असल्याने त्याला 26 दिवसात केवळ 34 इंजेक्शन मिळू शकले. यामुळे त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी प्रकृती खालावत चालली आहे, असे कुटुंबाकडून सांगितले जात आहे. इंजेक्शन मिळत नसल्याने कुटुंबीयांनी उपचार करण्यासाठी लागणारे पैशाची जुळवाजुळव केली. यामुळे दररोज इंजेक्शन मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मेल करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोनाचा उपचार घेतांना या काळात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी करावी लागणारी भटकंती पत्रातून मांडण्यात आली. यासोबत आता म्यूकरमायकोसिससाठी इंजेक्शन मिळवण्याची धडपड करावी लागत आहे. महाराष्ट्र सरकार इंजेक्शन का पुरवत नाही? इंजेक्शन पुरवण्यास सरकार असक्षम आहे का? याची जबाबदारी कोण घेणार? अपुऱ्या इंजेक्शनमुळे माझ्या भावाला काही झाल्यास याला जबाबदार कोण? असे सवाल हर्षलाने विचारले आहे. यासोबत माझा भावाला काही झाल्यास सर्वस्व महाराष्ट्र सरकार जवाबदार राहील, असा शब्दावर संतापही व्यक्त करण्यात आला आहे. यावर चेतन यांनी ईटीव्हीशी बोलतांना सांगितले, की मुख्यमंत्री कार्यालयातून हे पत्र आरोग्य विभागाला पाठवल्याचे सांगण्यात आले.परंतु अजूनही उत्तर मिळाले नाही.
म्यूकरमायकोसिसची नागपूर जिल्ह्यातील स्थिती
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1310 रुग्णाना म्यूकरमायकोसिसने ग्रासल्याचे प्रकरण पुढे आले आहे. यात 123 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 902 रुग्ण हे खाजगी रूग्णालयात उपचार घेत असताना 99 जण दगावले. तर 408 रुग्ण हे शासकीय रुग्णालयात उपचार घेतांना 24 रुग्ण दगावले आहे. 494 रुग्ण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहे. 935 जणांवर शस्त्रक्रिया झाली आहे. 682 जण हे रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतले आहे.
पूर्व विदर्भातील स्थिती
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण दिसून येत असले तरी विदर्भातील अनेक जिल्ह्यासह छत्तीसगढ, मध्यप्रदेशमधून रुग्ण उपचार घेण्यासाठी नागपुरात येत असतात. यात पूर्व विदर्भातील इतर पाच जिल्ह्यात आतापर्यंत 210 रुग्ण आढळून आले, असून भंडारा 16, चंद्रपूर 90, गोंदिया 44, वर्ध्यात 101 म्यूकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहे. यात 9 जण दगावले आहे. यात 126 जणांवर उपचार सुरू आहे. 83 रुग्ण हे उपचार घेत आहेत.
हेही वाचा-नीती आयोगाचे प्रमाणापत्र मिळालेले विदर्भातील एकमेव वाचनालय