नागपूर : आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार तसेच पाली साहित्याचे गाढे अभ्यासक, नागपूर विद्यापीठातील आंबेडकर चेअरचे प्रमुख डॉ. भाऊ लोखंडे यांचे आज हृदय विकाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. डॉ. भाऊ लोखंडे सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडन्ट्स फेडरेशनचे प्रणेते होते. तसेच, बौद्ध आणि दलित साहित्याच्या चळवळीत महत्त्वाचे योगदान असलेले आंबेडकरवादी विचारवंत म्हणूनही त्यांची ओळख होती. ते विदर्भ साहित्य संघ दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.
डॉ. भाऊ लोखंडे यांचा जन्म १५ जून १९४२ला झाला होता. ते मराठी सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडन्ट्स फेडरेशनचे प्रणेते होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील पदव्युत्तर पाली प्राकृत विभागाचे माजी रीडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते. याशिवाय त्यांनी अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केले आहे.
त्यांनी ‘मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव’ या विषयावर पीएच.डी.साठीचा शोधप्रबंध लिहिला आहे. तसेच ‘रशियातील बौद्धधर्म’ हे पुस्तक लिहिले आहे. गडचिरोलीच्या महात्मा फुले, आंबेडकर विचारमंचाच्या वतीने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. भाऊ लोखंडे होते. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन, साताऱ्याच्या प्रतिभा रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास