नागपूर - पोलंड येथे झालेल्या युवा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नागपूरच्या कन्येचा पंच आणि भारताच्या खात्यात इतिहासातील पहिल्या सुवर्ण पदकाची नोंद झाली. भारताच्या शिरपेचात आणखी एक सुवर्ण तुरा रोवला गेला. अलफिया पठाण हिने वयाच्या 18 वर्षी ही कामगिरी करून दाखवली. सुरुवातीला 'बॉक्सिंग काय तर मारपीट', असे म्हणणारी अलफिया पठाण आता वर्ल्ड चॅम्पियन झाली आहे. तिने ८१ वजनी गटात सुवर्णपदक मिळवले.
अशी झाली सुरुवात -
जागतिक स्पर्धेत यश मिळवण्यासाठी तिने कठीण परिश्रम घेतले. नागपूरच्या मानकापूर स्टेडियमवर तिचे प्रशिक्षिण झाले. लहान असताना ती मोठा भाऊ शाकीबसोबत मैदानावर बॅडमिंटन खेळायला जात असे. त्यावेळी भावाचे प्रशिक्षक गणेश पुरोहित यांचे लक्ष तिच्यावर गेले. त्यांनी तिला बॉक्सिंग खेळशील का, अशी विचारणा केली. 'क्या करना है बॉक्सिंगमें मारपिटही करना है', असे उत्तर देत वडिलांनी म्हटले तर खेळू असे अलफियाने सांगितले.
कुटुंबियांनी दिली साथ -
अलफियाच्या वडिलांनी सुरुवातीला तिला नकार दिला. मात्र, प्रशिक्षक गणेश पुरोहित तिच्या वडिलांकडे पाठपुरावा करत राहिले. त्यांनी तिला शिकवण्यास सुरुवात केली. शांत डोक्याने विचार करून निर्णय घेण्याची क्षमता अलिफियामध्ये आहे. बॉक्सिंगमध्ये डावपेच शिकताना इतरांच्या तुलनेत ती अतिशय कमी वेळात शिकत असे. तिचे कौशल्य पाहून तिच्या कुटुंबियांनी तिला पाठिंबा दिला. उत्तम प्रशिक्षण आणि तिच्या जिद्दीच्या जोरावर तिला यश मिळाले. खेळाच्या प्रती तिचे ध्येय पाहता तिने 10वीचे दोन पेपर सुद्धा दिले नाही, असे तिचे वडिल सांगतात. खेलो इंडियाच्या माध्यमातून तिला पाठबळ मिळाले आणि यामुळे ती जागतिक स्पर्धेत दाखल झाली.
तिचे पुढचे लक्ष ऑलिम्पिक असणार आहे. ऑलिम्पिकच्या अटीनुसार तिला 75 किलोच्या आत वजन आणावे लागेल. तिला त्यासाठी प्रशिक्षित करण्याचे नियोजन सुरू आहे. तिच्या जिद्दीमुळे तिला ऑलिम्पिकमध्ये नक्की यश मिळेल, असा विश्वास तिचे नागपूरचे प्रशिक्षक गणेश पुरोहित आणि वडील अक्रम पठाण यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - DC VS SRH : सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा विजय, हैदराबादचा सलग चौथा पराभव