नागपूर - पाणी टंचाईच्या विरोधात उत्तर नागपूरमधील आसि नगर झोनमध्ये प्रदेश युवक काँग्रेसतर्फे मटका फोड आंदोलन करण्यात आले. शहराला पाणी पुरवठा करणारी ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्लू) ही खाजगी कंपनी आहे. तसेच ओसिडब्लूच्या मनमानी कारभाराला सामान्य जनता त्रासली आहे, असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.
शहरात पाणीटंचाईमुळे पाणीकपातीची नामुष्की आली आहे. आधी आठवडाभरासाठी एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता. मात्र, आता हा नियम एक महिन्यासाठी लागू करण्यात आला आहे.
शहराला पाणी पूरवठा करणाऱ्या ऑरेंज सिटी व्हॅटर असोसिएशनच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जलाशयातून जलसाठ्याकडे पाणी पूरवठा करणाऱ्या अनेक पाइपलाईनला गळती आहे. मात्र, ओसीडब्लू (ऑरेंज सिटी वॉटर) च्या नियोजनशून्य कारभारामुळे ही नामुष्की उद्भवलीय, असा आरोपही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना दरमान केला.