नागपूर - कोरोनाच्या संभाव्य तीसऱ्या लाटेचा धोका पाहता ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. एकीकडे ग्रामीण भागात जनजागृती अभियान सुरू आहे, तर दुसरीकडे प्रभावी वैद्यकीय उपचारासाठी अधिकार्यांना देखील प्रशिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये लहान मुलांच्या अनुषंगाने प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील सर्व आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांना 7 ते 18 जून या कालावधीत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
3 संस्थांमध्ये दर दिवशी 120 प्रशिक्षणार्थींना मिळणार प्रशिक्षण
तीसऱ्या लाटेचा संभाव्य धोका, विषेशतः लहान मुलांना असलेल्या संभाव्य धोका लक्षात घेता, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रशिक्षणाची आखणी केली आहे. नागपूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका असे जवळपास एक हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा या प्रशिक्षणात सहभाग असणार आहे. हे प्रशिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, लता मंगेशकर हॉस्पिटल या तीन संस्थांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी चाळीस याप्रमाणे तीन संस्थांमध्ये दर दिवशी 120 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हेही वाचा - दिलासादायक! जून महिन्याच्या पहिला दिवस बाधितांची संख्या 203 वर
याबाबत नुकतीच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयात सभा घेण्यात आली. या सभेमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. भारसाकडे, डॉ. वैशाली शेलगावकर, डॉ. अंजली भुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा - बिबट्याला सुरक्षित जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न