नागपूर - गेल्या 2 दिवसांपासून हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा नागपूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक अनुप कुमरे यांनी केला आहे.
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याने ब्लँकेटच्या चिंधीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती खोटी आहे. त्या संदर्भात नुसत्या अफवा पसरवल्या जात आहेत, अशी माहिती कुमरे यांनी दिली. तसेच लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कॉलेजमध्ये जात असताना पीडितेवर 3 फेब्रुवारीला आरोपी विकेश नागराळेने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात पीडित शिक्षिकेचा चेहरा पूर्णपणे जळाला होता. श्वसननलिकेला देखील मोठी इजा झाली होती. डॉक्टरांनी वेळोवेळी शस्त्रक्रिया करुन पीडितेला वाचवण्याचा पुरेपर प्रयत्न केला. मात्र, तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी आरोपी सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे. त्याला विशेष निगराणीत ठेवण्यात आले आहे. त्याच्या आत्महत्येच्या प्रयत्नांची माहिती खोटी असून अशी चुकीची माहिती कुठून बाहेर आली याची चौकशी कारगृह प्रशासन करणार आहे. अत्यंत संवेदनशील प्रकरणात चुकीची माहिती आणि बातम्यामुळे कारगृह प्रशासनाची बदनामी होत आहे. नगराळे हा कारागृहात सुरक्षित आणि स्वस्थ आहे, असे कुमरे यांनी सांगितले.