नागपूर - मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा कोरोनाच्या विषाणूंनी शिरकाव केला आहे. मुंबई बॉम्ब स्फोटात सहभागी असलेले दोन दहशतवादी, एक नक्षलवादी आणि तुरूंग रक्षकासह नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या तीन महिन्यात २२ बंदीवनांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते सर्व कैदी कोरोनामुक्त झाले होते. मात्र, कोविडच्या दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूंनी कारागृहात प्रवेश करताच थैमान घालायला सुरवात केल्याने कारागृह प्रशासनाची चिंता वाढली आहे.
९ जणांना एकाच वेळी कोरोनाची बाधा
नागपूर मध्यवर्ती कारागृहात सध्या २२०० कैदी आहेत. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी आणि नक्षलवाद्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरापासून नागपूर मध्यवर्ती कारागृह कोरोनाचा सामना करत आहे. वर्षाच्या सुरवातीपासूनच २२ बंदिवानांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता परत एकदा ९ जणांना एकाच वेळी कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये फाशीची शिक्षा झालेले तीन कैदी आणि मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांचा समावेश आहे. यापैकी काही बंदीवानांना उपचारासाठी काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कारागृहात लसीकरण सुरू असताना बधितांची संख्या वाढली -
नागपूर मध्यवर्ती कारागृहात दोन दिवसांपूर्वीच करोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. आतापर्यंत २० पेक्षा अधिक कैद्यांना लस देण्यात आली आहे. दरम्यान एका कैद्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी आणखी सात कैद्यांची प्रकृती खालवली. त्यांचीही तपासणी करण्यात आली. त्यानंतर सगळे करोनाबाधित असल्याचा अहवाल आला होता.